राजगुरुनगर : ग्रामपंचायत निवडणुका तीन दिवसांवर आल्या असतानाही खेड तालुक्यात मतदार याद्यांचे घोळ सुरूच असून, अनेक गावांमध्ये दुसऱ्या ठिकाणचे मतदार घुसविले असल्याच्या तक्रारी लोकांकडून येत आहेत.खेड तालुक्याच्या मतदार याद्यांमध्ये गेल्या वर्षभर सुरू असलेला घोळ अद्यापही संपलेला नाही. अनेक गावांमध्ये दुबार मतदार आहेतच, पण आता या गावाचे मतदार त्या गावात असेही प्रकार आढळत आहेत.मरकळ गावाच्या मतदार यादीत साकुर्डी गावाचे ५७ मतदार असल्याचे आता आढळून आले आहे. तसेच कुरुळी गावाच्या यादीत मरकळचे मतदार आढळले आहेत. इतरही अनेक गावांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडचे मतदार आहेत तर काही गावांमध्ये या प्रभागातले मतदार त्या प्रभागात असेही प्रकार पाहावयास मिळत आहेत.राजगुरुनगर नगर परिषदेच्या मतदार यादीतला घोळ तर चर्चेचा विषय झाला होता. सध्या राजगुरुनगर नगर परिषदेचा स्वीकृत नगरसेवक पूर्वी आळंदीच्या मतदार यादीत होता. राजगुरुनगर नगर परिषदेच्या यादीतील अनेक जण आता गावागावांमध्ये मतदार असल्याने उमेदवार त्यांना शोधत येथे येत आहेत. येथील एका महिला नगरसेवकाचा मुलगा रेटवडी गावाचा सदस्य झाला आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने असे चमत्कार घडत आहेत.मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर नागरिकांनी हरकती घेतल्या असत्या तर असे प्रकार थांबवता आले असते असे प्रशासन सांगत आहे. तर आम्ही हरकती घेऊनही काही उपयोग झाला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.आम्ही आमचा निर्णय दिला आहे, तुम्ही वरच्या न्यायालयात जाऊ शकता, असे उत्तर दिल्याचे लोक सांगतात. वरच्या कोर्टात घाईगडबडीच्या काळात कोणी जात नाही, याचा फायदा घेऊन प्रशासन बेमूर्वतपणे वागत आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
मतदार यादीतील घोळ संपेना
By admin | Published: August 01, 2015 4:31 AM