भोर : भोर एसटी आगाराकडून भोर-पुणे मार्गावरील एका स्टेजचे प्रत्येक माणसी जादा घेतले जाणारे तिकिटाचे ७ रुपये कमी करण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी १ आॅक्टोबरपासून करण्यात येणार आहे. यामुळे एसटी महामंडळाकडून भोर तालुक्यातील नागरिकांचे दररोजचे १९,६०० रुपये व महिन्याला ५ लाख ८८ हजार रुपये होणारी लूट वाचणार आहेत. भोर एसटी आगाराकडून भोर-स्वारगेट मार्गावरील प्रवाशांकडून घेतले जाणारे ७ रुपये जादा प्रवास भाडे एसटी महामंडळाने रद्द करावे, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्याकडे केली होती. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या मागणीचा विचार करून एसटी महामंडळाने एका स्टेजच्या तिकिटाचे जादा घेतले जाणरे ७ रुपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पुणे शहरातील स्वारगेट चौकातील वाहतुकीच्या प्रश्नामुळे भोर आगाराच्या एसटी गाड्या मार्केट यार्ड सेव्हन लव्हज चौकातून स्वारगेट बसस्थानकात नेल्या जातात. यामुळे अडीच किलोमीटर प्रवास वाढतो. त्यासाठी प्रवाशांना विनाकारण ७ रुपये जादा भाडे द्यावे लागत होते. भोरवरून स्वारगेटला जाण्यास ५१ रुपये लागतात. मात्र अडीच किलोमीटर अंतर वाढत असल्याने प्रवाशांना विनाकारण ५७ रुपये द्यावे लागत होते. भोर वगळता इतर सर्व आगाराच्या गाड्या लक्ष्मीनारायण चौक, जेधे चौकातून स्वारगेट बस स्थानकात जातात. परंतु स्वारगेट येथील उड्डाणपुलाचे काम झाले असून वाहतूकही सुरळीत झाली आहे. तरीही गाड्या मार्केट यार्डतूनच जातात. यामुळे प्रवासांना ७ रुपये जादा द्यावे लागत होते. (वार्ताहर)- बसमध्ये सुमारे ४० प्रवासी असतात. एका प्रवाशामागे ७ रुपयांप्रमाणे २८० रुपये अशा ७० फेऱ्या असून दररोज १९,६००, तर महिन्याला ५ लाख ८८ हजार महामंडळास जादा मिळत होते. असे सहा महिने सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपये महामंडळाकडून प्रवाशांची लूट केली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही आगार व्यवस्थापनाकडून लक्ष दिले जात नव्हते.
अखेर एसटीचे ७ रुपये तिकीट कमी
By admin | Published: September 28, 2016 4:34 AM