कोथरूड : कोथरूडच्या डोंगरपायथ्यालगत म्हातोबानगरजवळ सध्या खासगी मालकीच्या जागेत साफसफाई आणि राडारोडा उचलण्याचे काम जोरात सुरूआहे. मात्र साफसफाईच्या कामाने या भागातील नैसर्गिक प्रवाहाचे मार्ग बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वतीने संबंधित ठिकाणी पाहणी करून खोदाई होत नसल्याची खातरजमा केली असली तरी जागा विकसित करताना नैसर्गिक प्रवाहाची दिशा बदलत किंंवा नष्ट होण्याची भीती स्थानिकांना वाटत आहे.म्हातोबानगर लोकवस्तीच्या दोन्ही बाजूला डोंगर उतार असल्याने पावसाच्या पाण्याचे प्रमाण जास्त असते. या वस्तीच्या पश्चिमेकडील पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी संरक्षण खात्याच्या जागेसह नाला विकसित करण्यात आला आहे. परंतु या नाल्यावर पुढच्या टप्प्यात झालेली अतिक्रमणे आणि अरुंद व्यासाने नाल्यालगतच्या लोकांच्या घरात पाणी घुसण्याचे प्रकार सध्या घडत आहेत. पावसाच्या दरम्यान दरवर्षी या भागातील पाणी घरात घुसण्याची शक्यता आहे. त्यातच आता नव्याने या भागातील नागरिकांना उत्तरेच्या डोंगरावर सुरू असलेल्या साफसफाईच्या कामाने पावसाचे पाणी वस्तीच्या अंतर्गत भागात घुसण्याची भीती वाटत आहे.पुणे महापालिकेच्या वतीने या प्रकाराची पाहणी करून नैसर्गिक नाले विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. (वार्ताहर)----------महापालिकेचे स्थानिक बांधकाम निरीक्षक अभियंते यांनी साफसफाईच्या कामाची पाहणी केली असल्याचे सांगितले. पावसाळ्यात येथील पोकळ माती वाहत आल्याने अनेकदा नाल्यामधून पाणी बाहेर येते. येथील राडारोडा उचलण्यात आल्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असे सांगितले. सध्या या भागात फक्त साफसफाईची कामे होत असून, बांधकाम करताना नैसर्गिक प्रवाहांवर अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.
नैसर्गिक प्रवाह धोक्यात?
By admin | Published: May 06, 2015 6:10 AM