येथील नूतन वीज उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून उभारलेल्या भादलवाडी उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. अध्यक्षस्थानी खासदार सुप्रियाताई सुळे होत्या; तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम बोलताना राज्यमंत्री भरणे यांनी कृषिपंपांच्या वसुलीकडे लक्ष वेधले. या भागातील शेतकऱ्यांकडे कारखान्याला ऊस गेल्याशिवाय पैसा येत नसल्याने दिवाळीनंतर वसुलीला वेग देण्याची मागणी ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे केली; तर मागणी करताना ज्यांच्याकडे पैसे असतील, त्या शेतकऱ्यांनी विनाविलंब थकबाकी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही भरणे यांनी केले.
राज्यमंत्री भरणे यांनी केलेल्या मागणीला उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी, कृषी धोरणानुसार थकबाकी भरण्यासाठी वेळ दिल्याचेही सांगितले. या योजनेचा फायदा आपल्याच भागाला होत असल्याने ‘कृषी आकस्मिक निधी’च्या माध्यमातून पायाभूत वीजयंत्रणा बळकट करण्याची ही संधी असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत पडीक व माळरान जमिनीवर सौरप्रकल्प साकारून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येत आहे. त्याकरिता शेतकऱ्यांची पडीक माळरान जमीन प्रतिवर्ष ३० हजारांप्रमाणे भाड्याने घेतली जात आहे. तसेच ही प्रक्रिया अत्यंत सोपी केली असून, त्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. सुप्रियाताईंनी भादलवाडी उपकेंद्रासाठी पुढाकार घेत जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल तनपुरे यांनी खासदार सुळे यांचे आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात खा. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, भादलवाडीप्रमाणे झगडेवाडी येथील उपकेंद्राचे कामही लवकरच पूर्ण होईल. त्यासोबतच अनेक नवीन उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. स्थापित क्षमता वाढल्यामुळे विजेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल; तसेच शेतीपंपाचे नवीन कनेक्शनही देता येतील.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशाली पाटील, पंचायत समित्या सदस्या सारिका लोंढे, सरपंच शिवाजी कन्हेरकर,जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर, डी. एन. जगताप, सचिन बोगवत, हनुमंत कोकाटे, अभिजित तांबिले, विद्युत नियंत्रण समिती सदस्य प्रवीण शिंदे व स्वप्निल सावंत यांच्यासह महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, भाऊसाहेब इवरे यांच्यासह स्थानिक अभियंते, कर्मचारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
पाच गावांतील वीजग्राहकांना उपकेंद्राचा फायदा
भादलवाडी येथे झालेल्या वीज उपकेंद्रामुळे भादलवाडीसह कुंभारगाव, बंडगरवाडी, डाळज नं. १ व नं. २ या पाच गावांतील शेतीपंप, गावठाण व औद्योगिक ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
भादलवाडीपूर्वी कुंभारगावची निवड करण्यात आली होती. तिथे जागा मिळाली नाही. भादलवाडीतही जागेची अडचण होती. मात्र खा. सुळे यांच्या शब्दावर इंडिया टेरीटॉवेल या कंपनीने विनामोबदला दीड एकर जागा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत इंडिया टेरीटॉवेल कंपनीचे कीर्ती रुईया यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सोबत : वीज उपकेंद्राच्या उद्घाटनाचे फोटो.