पुणे : रफ्तार टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडची किमो ही बस कंपनी, केपीआयटी व प्रयास एनर्जी ग्रुप (पीईजी) या तीन कंपन्यांशी आज स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी चर्चा करून, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. सार्वजनिक वाहतुकीतील सुधारणा व सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हे करार करण्यात आले. केपीआयटीचे प्रतिनिधी अब्बास रावत यांनी सांगितले की, पीएमपीएमएल वाहनांमध्ये इलेक्ट्रिक बस सिस्टीमद्वारे पर्यावरणपूरक सुविधांचा वापर करून, बसमध्ये वातानुकूलन व्यवस्था, स्वतंत्र नियंत्रण कक्ष अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. प्रवाशांना गाडीत बसल्यावर आपल्या मोबाईलवर प्रवासावेळी संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे अशा सुविधा उपलब्ध होतील. बसथांब्यावरही टी. व्ही. स्क्रीन, गाडीमध्ये एलइडी स्क्रिन उपलब्ध करून देण्यात येईल. प्रयास एनर्जी ग्रुप (पीईजी) कंपनीचे प्रतिनिधी शंतनू दीक्षित यांनी सांगितले, की जगभर सौरऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे, आपल्याकडे मात्र अजूनही त्याकडे संशयानेच पाहिले जाते. स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यामध्ये सौरऊर्जेचा वापर वाढावा, असा या कराराचा हेतू आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे, त्यांना माहिती देणे, साधने उपलब्ध करून त्याच्या वापराचे प्रशिक्षण देणे कंपनीद्वारे करण्यात येईल. कंपनीचे वरिष्ठ संशोधन अधिकारी अश्विन गंभीर, पुणे सेंटरचे प्रशांत गिरबाणे व अन्य प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. रफ्तार टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या किमो या बससेवेच्या सुविधा शहरातील नागरिकांकरिता उपलब्ध देण्यासंदर्भात कंपनीचे प्रतिनिधी सिद्धार्थ शर्मा यांच्याशीही आयुक्तांनी चर्चा केली. शर्मा यांनी सांगितले की, स्मार्टसिटी अंतर्गत शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सुविधा किफायतशीर, पर्यावरणपूरक व कार्यक्षमतेने दिली जाईल. प्रवाशांनी एकत्रिपणे मोबाईलवर मागणी केली की, त्यांना वाहन उपलब्ध करून दिले जाईल.
ऊर्जा, वाहतुकीत स्मार्ट होण्याच्या दिशेने पाऊल
By admin | Published: November 26, 2015 1:08 AM