पुणे : आश्रमशाळेला वीज कनेक्शन देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
विजयकुमार रामचंद्र मराठे (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. स्वारगेट परिसरात कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मराठे हे स्वारगेट येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या क्रमांक दोन कार्यालयात शाखा अभियंता आहेत. तक्रारदार यांची आश्रम शाळा आहे. त्यांना नळ कनेक्शन घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यावेळी मराठे याने तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर आज केलेल्या कारवाईत मराठे यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.