पुणे : कोथरूडमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याच्या आणखी एका साथीदारास राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी परिसरातून अटक केली. शिनाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. काेंढवा, मूळ रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे. या सर्वांना न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
पुण्यात पकडलेल्या दोघा दशतवाद्यांच्या तपासातून रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. आंबोलीच्या जंगलात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्यात लक्ष्य ठरलेल्या छबड हाऊसची रेकी केल्याचे समोर आले आहे. पुण्यासह मुंबईही दहशतवाद्यांच्या रडावर होती, हे स्पष्ट झाले आहे.
काझी हा एका आयटी कंपनीत मॅकेनिकल इंजिनीअर म्हणून नोकरी करतो. त्याला १५ लाख रुपयांचे पॅकेज आहे. असे असतानाही तो या रतलाम मॉडेलमध्ये सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. तो पुण्यात अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याच्या संपर्कात आला असल्याचे एटीएसचे म्हणणे आहे. त्याने इम्रान खान व युनूस साकी यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक मदत केली असल्याचे समोर आले आहे.
कोथरूड पोलिसांनी मोहम्मद इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी (दोघे रा. रतलाम, मध्य प्रदेश, सध्या रा. कोंढवा) या दोघांना पकडले. या दोघांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून मूळच्या गोंदियामधील आणि सध्या कोंढवा परिसरात वास्तव्याला असलेल्या अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याला पोलिसांनी अटक केली होती. या तिघांची एकत्रित चौकशी सुरू आहे. तपासात काझी याने आर्थिक रसद पुरवल्याची माहिती पुढे आली. त्याला शुक्रवारी अटक झाली.
अंबोलीच्या जंगलात सराव; मुंबईतील छबड हाऊसची रेकी - हे दहशतवादी कोल्हापूरला गेले होते. तेथे मुक्काम केल्यानंतर ते निपाणीला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केला. त्यानंतर संकेश्वर येथे गेले. - अंबोलीच्या जंगलात त्यांनी तंबू ठोकून मुक्काम केला. तेथे त्यांनी तेथे बॉम्बचे प्रशिक्षण घेतल्याची जागा या दहशतवाद्यांनी एटीएसला दाखविली. या तंबूचे साहित्य जप्त करण्यात आले. - त्या परिसराचे परीक्षण करून आवश्यक ते साहित्य फॉरेन्सिक तज्ज्ञांनी गोळा केले. त्यांनी मुंबईतील छबड हाऊसची रेकी केल्याचे समोर आले आहे. त्यांचा म्होरक्या खान फरार आहे.