पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जात असून विद्यापीठाने अवघ्या १८ दिवसात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला आहे.कोरोनामुळे ऑनलाईन पध्दतीने बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा घेण्यात आलेल्या तब्बल १० हजार ५०० विद्यार्थ्यांचा निकाल शनिवारी विद्यापीठाने प्रसिध्द केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील तब्बल ६ लाख १८ हजार विद्यार्थ्यांनी द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विद्यापीठातर्फे १२ जुलैपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरूवात करण्यात आली. परीक्षेला काहीसा विलंब झाल्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, विद्यापीठाने ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याचे नियोजन केले. त्यानुसार शनिवारी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले, विद्यापीठाचे कुलगुरू, प्र- कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या नियोजनबध्द कामामुळे १८ दिवसात निकाल प्रसिध्द करणे शक्य झाले. अभियात्रिकीच्या उर्वरित निकालासह आर्किटेक्चर, फार्मसी आदी व्यासायिक अभ्यासक्रमाचे निकाल येत्या आठवड्याभरात प्रसिध्द केले जाणार आहेत. तसेच परदेशातील शिक्षणासाठी गुणपत्रक हवे,असणा-या १६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाने विशेष बाब म्हणून निकाल दिला आहे.