पिंपरी : सोने खरेदी करून बनावट पेमेंट अॅपद्वारे २५ सराफांना गंडा घातला. इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, दुचाकी, असा एकूण पाच लाख ७७ हजार ६११ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. निखिल सुधीर जैन (वय २२, रा. उंड्री, पुणे, मूळ रा. औरंगाबाद), असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पैसे मिळवण्यासाठी युट्युबवर व्हिडिओ सर्च करायचा. त्यात त्याला बनावट प्रॅंक पेमेंट अॅप व वाॅलेटबाबत माहिती मिळाली. त्यातून त्याने फसवणुकीची युक्ती शोधली. पुणे आणि पिंपरी -चिंचवड परिसरातील सराफी दुकानांतून सोने खरेदी करून बनावट अॅप्लिकेशनमधून पेमेंट केल्याचा तो बनाव करायचा. पेमेंटसाठी दुकानातील क्युआर कोड स्कॅन करून त्यावर पेमेंट पाठवले असल्याचा मेसेज दुकानदारांना दाखवायचा. मात्र बनावट अॅप्लिकेशनमधून पेमेंट जात नव्हते. चिंचवडच्या सराफाकडून आरोपीने सोन्याचे नाणे खरेदी केले. त्याचे पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज त्याने दुकानदाराला दाखवला. मात्र पैसे खात्यावर न आल्याने दुकानदाराने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुंडा विरोधी पथकाने पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील २७४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला उंड्री, पुणे येथून ताब्यात घेतले. त्याने पिंपरी-चिंचवडमधील सहा, पुण्यातील १७ आणि पुणे ग्रामीणमधील दोन सराफ दुकानदारांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे निष्पन्न झाले.
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, सुनील चौधरी, विजय तेलेवार, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.