या उपक्रमात राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद शाळा आणि राजेश्वर विद्यालय या दोन शाळेतील इयत्ता चौथी ते नववीचे एकूण १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयातील १३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. १४ एप्रिल ते ९ मे दरम्यान हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. राजेगाव येथील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाने नवनवीन शैक्षणिक पैलू उलगडले.
कार्यक्रमाचा शुभारंभ दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे, विस्तार अधिकारी गोरक्षनाथ हिंगणे आणि केंद्रप्रमुख नंदा धावडे यांच्या उपस्थितीत झाला होता. तर समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. दत्ता थिटे आणि केंद्रप्रमुख वैशाली जानराव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे आणि राजेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ तांबे यांचे योगदान मिळाले.
विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, विविध प्रकल्प, भूगोल, समाजशास्त्र, पर्यावरण अशा विषयांची माहिती देण्यात आली. या उपक्रमाचा हेतू हा केवळ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना समजावून सांगणे एवढाच मर्यादित नसून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी साधता येईल आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात कशी भर पडेल हा होता. वकृत्व स्पर्धा घेऊन विद्यार्थ्याला मत मांडण्याची संधी देण्यात आली. मुलींसाठी आत्मरक्षणाचे धडे देणारे सत्रही घेण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य समन्वयक रणजित मेंगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमप्रमुख निकिता पाटील, तन्मय माने आणि २१ विद्यार्थी समन्वयक यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ऋतुजा लिंगमपल्ले हिने केले. सूत्रसंचालन ॠषिकेश दमामे व निवेदिता देशमुख यांनी केले. गौरवी मोरे हिने आभार मानले.
--