पुणे : अभियांत्रिकी प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राकरिता तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, येणाऱ्या पाचव्या हिवाळी सत्र ऑक्टाेबर २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विषय उत्तीर्ण हाेणे गरजेचे आहे. त्यानंतरच हे विद्यार्थी पाचवे सत्र तसेच तृतीय वर्षात प्रवेश घेण्यास पात्र ठरणार आहेत.
अभियांत्रिकी पदवी उन्हाळी सत्र परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी काेराेना प्रादुर्भाव काळानंतर मार्च / एप्रिल मधील परीक्षा विद्यापीठाने ऑफलाइन घेतल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. उन्हाळी सत्र मार्च / एप्रिल २०२३ मधील परीक्षांमधून हे विद्यार्थी पुढील तृतीय वर्ष व चतुर्थ वर्ष मध्ये जाण्यास प्रचलित आदेशानुसार अपात्र ठरत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशाची एक संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली हाेती. यासंदर्भात एनएसयूआय या विद्यार्थी संघटनांनी आंदाेलन केले हाेते.
तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रामध्ये तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अध्ययन, सत्रकर्म, प्रात्यक्षिके, फिल्ड व्हिजिट व इतर बाबी महाविद्यालयाने इतर नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पूर्ण करून घ्याव्यात. हिवाळी सत्राच्या २०२३ ऑक्टाेबर परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण विषय उत्तीर्ण हाेऊन जे विद्यार्थी प्रचलित तृतीय वर्षामध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरणार आहेत. पाचवे आणि सहावे सत्राकरिता सत्र समाप्तीच्या लेखी परीक्षा संबंधित विद्यार्थ्यांना एकत्रित उन्हाळी २०२४ परीक्षांमध्ये देता येणार आहेत. विद्यार्थ्यांना काही अटी आणि शर्तींवर तृतीय वर्षात प्रवेश देण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयास हमीपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. तात्पुरते प्रवेश दिलेले जे विद्यार्थी हिवाळी २०२३ मधील परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय वर्षाचे अनुशेष पूर्ण करू शकणार नाहीत व प्रचलित नियमानुसार तृतीय वर्षांच्या पाचव्या सत्राकरिता अपात्र ठरतील अशा विद्यार्थ्यांचा तात्पुरता प्रवेश हा आपाेआप रद्द हाेईल असेही अधिष्ठाता मंडळाच्या ठरावात नमूद केले आहे.