पुणे : हडपसर येथील अॅमनोरा व्हीक्ट्री टॉवर येथे शनिवारी मध्यरात्री दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या ६ आयटी इंजिनिअर्सना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे़ या तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने नागरिकांनी पोलिसांना कळविले़ त्यांना शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली़अभिषेक जेमिनी (वय २४), चंदन दीपक भंडारी (वय २४), अमनदीप शर्मा (वय २७), उत्कर्ष महावीर शर्मा (वय २४), रोहित हिरालाल वांगणू (वय ३०, सर्व रा. अॅमनोरा), राकेश शंभूदयाल शर्मा (वय २८, रा. वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ पोलीस शिपाई एच. एम. दूधभाते यांनी फिर्याद दिली आहे.अॅमनोरा व्हीक्ट्री टॉवरमधील २०२ क्रमांकाच्या इमारतीमध्ये रोहित वांगणू याचा फ्लॅट आहे. तो आणि त्याच ५ मित्र आयटी इंजिनियर आहेत. शनिवारी रात्री पार्टी करण्यासाठी हे सर्व जण वांगणुच्या घरी आले. पार्टी सुरू झाल्यानंतर दारू पिऊन धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने वैतागलेल्या रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून याची तक्रार केली. त्यामुळे पोलीस शिपाई दूधभाते आणि त्यांचे सहकारी मार्शल सोसायटीमध्ये गेले. त्यांनी या तळीरामांना शांत होण्यास सांगितले असता, त्यांनी तुम्ही आम्हाला शांत करणारे कोण, असे म्हणत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या दोन्ही पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. त्यावेळी या पोलिसांनी पोलीस ठाण्यात फोन करून वरिष्ठांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस ठाण्यातून आणखी काही पोलीस सोसायटीमध्ये आले. या सर्वांना ताब्यात घेऊन सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा करणे आणि मुंबई दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे़
अॅमनोरामध्ये इंजिनियर्सचा धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 6:59 AM