लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचे राज्यात आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. हे तिघेही पिंपरी चिंचवडमधील आहेत. त्यामुळे या रुग्णांचा आकडा ११ वर पोहचला असून दोघे जण बरे झाले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आल्यानंतर तिथून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत ४ हजार ८५८ जणांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यापैकी १२११ प्रवाशांचा २८ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. तर ३ हजार ४७६ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातील ७५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले.
त्यामुळे त्यांचे नमूने पुण्यातील राष्ट्रीय विषाणु संस्थेत (एनआयव्ही) जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्या ३० बाधितांपैकी १८ जणांचे नमुनेही एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही दिवसांपुर्वी ८ जणांमध्ये ब्रिटनमधील नवीन कोरोनाचे विषाणु आढळून आले होते. गुरूवारी (दि. ७) त्यामध्ये आणखी तीन जणांची भर पडली आहे. हे तिघेही पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
एकुण ११ जणांपैकी पुणे व मुंबईतील प्रत्येक एक जण बरा होऊन घरी गेले आहेत. तर प्रत्येकी एक जण गुजरात व गोव्यातील आहेत. पुण्यामध्ये आतापर्यंत केवळ एकच रुग्ण आढळून आला आहे.
--------
ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणाची स्थिती
प्रवासी सर्वेक्षण - ४,८५८
आरटी-पीसीआर चाचणी - ३,४७६
बाधित प्रवासी - ७५
संपर्कातील बाधित - ३०
एनआयव्हीकडे पाठविलेले एकुण नमुने - ९३
नवीन स्ट्रेनची बाधा - ११
--------------------