पुणे : महाराष्ट्राला कीर्तनाची एक परंपरा लाभली आहे. संतांच्या अभंगांचे गायन आणि निरूपण टाळ मृदुंगांच्या निनादात सादरीकरण होताना अद्वितीय अशा भक्तीरसात सर्वजण न्हाऊन निघतात. एका युवा कीर्तनकाराने वारकरी सांप्रदायातील कीर्तन भाव कायम ठेवत उपस्थितांना भक्तीयोगाची अनुभूती दिली. या अभिनव संकल्पनेला जगभरातील मंडळींनी दाद देत त्या कीर्तनकाराला जवळपास पाच ते सात मिनिटांची उभी राहून मानवंदना दिली, हे त्यातील विशेष! या कीर्तनकाराचे नाव आहे भावार्थ देखणे. चौथ्या आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवात भावार्थ देखणे यांना कीर्तनसेवा करण्याची संधी मिळाली. या महोत्सवाला पद्मश्री अॅवार्ड विजेत्या योगाचार्यांच्या शिष्यांची विशेष उपस्थिती होती. या सर्वांसमक्ष इंग्रजीमधून भक्तीयोग आणि कर्मयोगाची शिकवण देत त्यांनी मने जिंकली. वारकरी कीर्तन इंग्रजीमध्ये सादर करण्याच्या आधुनिक संकल्पनेचे सर्वांनी मनापासून कौतुक केले. या अनुभवाविषयी ‘लोकमत’शी बोलताना भावार्थ देखणे म्हणाले, वारकरी कीर्तनाची परंपरा ही खूप प्राचीन आहे. संत नामदेवांनी वारकरी कीर्तनाचा पाया रचला. सांस्कृतिक लोकशाहीची पायाभरणी करण्याचे काम या वारकरी कीर्तनाने केले. ‘शब्दवैभव’ हे या कीर्तनाचे वैशिष्ट्य. कोणत्याही दुसऱ्या भाषेत कीर्तन सादर करताना त्याची परिभाषा बदलते. निष्काम कर्मयोग, निर्गुण आणि सगुण या गोष्टी इंग्रजीमध्ये प्रभावीपणे मांडणे तसे अवघड काम आहे. संस्कृतमधले खूप प्रमाणित शब्द हे कीर्तनामध्ये असतात. त्याचे अर्थ इंग्रजीमध्ये समजेल अशा भाषेमध्ये सांगणे हे एक कौशल्य असते. दोन्ही बाजूंनी तो संवाद व्हावा लागतो. एका शिक्षकाच्या भूमिकेत काहीसे शिरावे लागते. पण हा अनुभव खूपच आनंददायी होता. ही कीर्तन सेवा सादर करताना अंगात ताप होता तरीही कोणताही शीण जाणवला नाही. ईश्वरानेच ही सेवा हातून करवून घेतली. वडिल डॉ. रामचंद्र देखणे यांनी या परंपरेचा वारसा दिला त्याबददल त्यांचा मी कायमच ॠणी राहीन.
पुण्यातील आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवात भावार्थ देखणे यांनी सादर केले इंग्रजीमध्ये कीर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 6:37 PM
एका युवा कीर्तनकाराने वारकरी सांप्रदायातील कीर्तन भाव कायम ठेवत उपस्थितांना भक्तीयोगाची अनुभूती दिली. चौथ्या आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवात भावार्थ देखणे यांना कीर्तनसेवा करण्याची संधी मिळाली. या महोत्सवाला पद्मश्री अॅवार्ड विजेत्या योगाचार्यांच्या शिष्यांची विशेष उपस्थिती होती.
ठळक मुद्देचौथ्या आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवात भावार्थ देखणे यांना कीर्तनसेवा करण्याची मिळाली संधीकीर्तन सेवा सादर करताना अंगात ताप होता तरीही कोणताही शीण जाणवला नाही : भावार्थ देखणे