पुणे : शिक्षकांच्या कमतरतेसह मूलभूत सुविधांचा वाढता खर्च आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसल्याने महापालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये ज्युनियर केजीसाठी ६० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचा फटका शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजूंना बसत आहे. ही बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. त्याची गंभीर दखल घेत, सर्व इंग्रजी शाळांचा आणि शिक्षकांचा आढावा घेऊन या शाळांमध्ये वाढीव तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी उद्या (मंगळवारी) महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे गरजूंना पालिकेच्या इंग्रजी शाळांचे दरवाजे पुन्हा उघडणार आहेत. शहरातील ३०० शाळांमध्ये जवळपास ५१ शाळांमध्ये ज्युनियर केजीच्या १५४ तुकड्या आहेत. मात्र, या तुकड्यांच्या नैसर्गिक वाढीनंतर आवश्यक शिक्षक तसेच मूलभूत सुविधा आणि या तुकड्यांचा वाढता भार प्रशासनास पेलवणार नसल्याने या वर्षीपासून या इंग्रजी शाळांमध्ये ज्युनियर केजीच्या प्रवेशाच्या केवळ प्रत्येकी ३० मुलांच्या दोनच तुकड्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
इंग्रजी शाळांची दारे गरिबांसाठी उघडणार
By admin | Published: April 07, 2015 5:48 AM