सध्या विद्यार्थ्यांना अनेक आव्हांनाचा सामना करावा लागत आहेत. ही आव्हाने समर्थपणे पेलू शकतील असे विद्यार्थी घडविण्यावर माझा भर राहील. समाजाभिमुख संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी भारती विद्यापीठाची टीम सदैव कार्यरत आहे. संस्थापक कै. डॉ. पतंगराव कदम यांनी आखून दिलेल्या मार्गावरून आमची वाटचाल यापुढील काळातही सुरू राहणार आहे, अशी भावना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे नवनियुक्त कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी व्यक्त केली.डॉ. कदम म्हणाले, की भारती विद्यापीठाने सुरुवातीपासूनच गुणवत्ता आणि संशोधनाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. आगामी काळात कुलपती म्हणून काम करतानाही यावरच सर्वाधिक भर राहील. पुढील १० वर्षांचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार वाटचाल केली जाणार आहे.पर्यावरणपूरक उपक्रमांवर आम्ही विशेष भर देत आहोत. त्यासाठी शिक्षक, प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.पाश्चात्त्य देशांमधील विद्यापीठांना जोडून घेऊन शैक्षणिक आदान-प्रदान करण्यासाठी भारती विद्यापीठाने ५२ परदेशी विद्यापीठांसमवेत करार केले आहेत.परदेशातील प्राध्यापक, विद्यार्थी इथे येतात. आमचे प्राध्यापक, विद्यार्थी परदेशामध्ये जातात. या माध्यमातून नवनवीन संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण क्षेत्रातील बदल याची माहिती होण्यास मदत होते. जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांनुसार भारती विद्यापीठामध्येही उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी नेहमी प्रयत्न केले.विद्यापीठात गुणवत्तापूर्ण संशोधन व्हावे, याकडे लक्ष दिले जाते. आंतरराष्टÑीय, राष्टÑीय सेमिनारमध्ये विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शोधनिबंध सादर केले जातात.भारती विद्यापीठाकडून ५४ पेटंटसाठी दावेदारी सांगण्यात आलेली आहे. त्याचबरोबर, नुकतेच डेंगीवर एक महत्त्वपूर्ण संशोधन विद्यापीठामध्ये करण्यात आले आहे.देशभरातील ७५० विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले. त्यामध्ये विद्यापीठाने देशात ५३वा क्रमांक पटकावला आहे. राज्यामध्ये भारती विद्यापीठाच्या सर्वाधिक ५ महाविद्यालयांना एनआरएफ रँकिंग मिळाले आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे.शिक्षण (टीचिंग लर्निंग), संशोधन (रीसर्च), विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणारी नोकरीची संधी (ग्रज्युएट आऊटकम), सर्वसमावेशकता (आऊटरीच इनक्लिब्लिटी), लोकांचे मत (परसेप्शन) या निकषांच्या आधारे सर्व विद्यापीठांचे मूल्यांकन करून त्यांना एनआरएफ रॅकिंग देण्यात येते. त्या सर्व गुणवत्तेच्या कसोट्यांमध्ये भारती विद्यापीठ अव्वल ठरले आहे. भारती विद्यापीठ संस्थेला १९९६मध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळाला. त्यानंतर सातत्याने विद्यापीठाने शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. भारती विद्यापीठामध्ये उच्च शिक्षित प्राध्यापक असावेत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. विद्यापीठातील या प्राध्यापकांमुळे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे. विद्यापीठांबरोबर महाविद्यालयांच्या मानांकनामध्येही भारती विद्यापीठाच्या महाविद्यालयांनी उज्ज्वल यश संपादन केले. पूना कॉलेज आॅफ फार्मसी,राजीव गांधी इन्स्टिट्यूट आॅफ आयटी अँड बायोटेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाल, सांगलीचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्युअरशिप डिर्पाटमेंट आदी महाविद्यालयांना एनआरएफ रँकिंग मिळाले आहे.भारती विद्यापीठातील महाविद्यालयांची ही कामगिरी इतर खासगी विद्यापीठांच्या तुलनेत अत्यंत सरस आहे. नॅक मूल्यांकनामध्येही विद्यापीठाने सातत्याने चांगली ग्रेड मिळविली आहे. सध्या विद्यापीठाला नॅक कमिटीकडून ए प्लस मानांकन मिळाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, भारती विद्यापीठाचे कुलगुरू, पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, अधिसभा, पूना कॉलेज आॅफ फार्मसीचे प्राचार्य आदी ठिकाणी ३ दशकांहून अधिक काळ केलेल्या कामाच्या अनुभव पाठीशी आहे. संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी घालून मार्गावर यापुढील वाटचाल सुरू राहणार आहे.
सक्षम विद्यार्थी घडविण्यावर भर - प्रा. डॉ. शिवाजीराव कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:59 PM