पुणे : राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवनाथ लोंढे यांच्या पुढाकाराने ‘नायगाव ते पुणे’ पदयात्रा काढून प्रबोधन करण्यात आले. ही प्रबोधन यात्रा पुण्यात आल्यानंतर महात्मा फुले वाड्यातून लालमहालापर्यंत साऊ-जिजाऊ पदयात्रेतून सत्यशोधक विचारांचे प्रबोधन करण्यात आले. या पदयात्रेची सांगता लालमहाल येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून करण्यात आली. नवनाथ लोंढे, मधुकर निरफराके, कॉ. किशोर ढमाले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या, की साऊ-जिजाऊ ही पदयात्रा केवळ अंतर कापणारी नाही, तर विचारांचा पूल बांधणारी आहे. स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा यांचा संदेश देणारी आहे. महिलांना मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यांनी घेतलेली भरारी याला सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊंचा इतिहास आहे. या प्रसंगी गणेश चव्हाण, अॅड. संपत कांबळे, दीपक गिरमे, रघुनाथ ढोक, सुप्रिया चव्हाण, अनिता टेकाळे, वामन वाळवी आदी उपस्थित होते. ‘जय साऊ... जय जिजाऊ... जय ज्योती... जय क्रांती...’ अशा घोषणा या पदयात्रेत देण्यात आल्या. तसेच रघुनाथ ढोक व दीपाली गुप्ता यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशात लक्ष वेधून घेतले.
साऊ-जिजाऊ पदयात्रेतून प्रबोधन
By admin | Published: January 14, 2017 3:38 AM