लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : नीरा-नृसिंहपूर हे तीर्थक्षेत्र संपूर्ण देशात आगामी काळात नावारूपास येणार आहे. तालुक्याच्या वैभवात यामुळे भर पडणार आहे. सध्या येथील विकासकामे प्रगतिपथावर आहे, ती उच्च दर्जाची कशी करता येतील यावरच ठेकेदार व अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथे सध्या २६० कोटी रुपयांच्या मंजूर आराखड्यातील कामे प्रगतिपथावर आहेत. त्याची भरणे यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या वेळी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम वांकर, श्रीकांत दंडवते, श्रीकांत बोडके, माजी सरपंच जगदीश सुतार, नरहरी काळे, संतोष सुतार,डॉ. सिद्धार्थ सरवदे, दशरथ राऊत, यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सिनेदिग्दर्शक अभिनेता नितीन सरवदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.भरडे म्हणाले, ‘‘काम करताना वेदना होतात. या सगळ्या वेदना त्यालाच माहीत असतात; त्यामुळे चिडचिड होते. यामुळेच माझ्या तोंडून तालुक्यात काही विधान निघालं. लक्ष्मी-नृसिंहांच्या साक्षीनं सांगतो, की कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.’’ शेवटी काम करणाऱ्या माणसाला राग येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
नीरा-नृसिंहपूरची विकासकामे दर्जेदार करा : भरणे
By admin | Published: May 07, 2017 2:17 AM