एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले? अजित दादा शरद पवारांवर थेट बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:16 PM2024-04-17T22:16:37+5:302024-04-17T22:17:36+5:30
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तुमच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नव्हती. पण आरोप तर झाले ना? बदनामी तर झाली ना? असा सवाल करीत अजित पवार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपातदेखील सत्यता नाही. विरोधक माझ्यावर आरोप करतात, पण माझं मन मला सांगतं मी कोणाच्या पाच पैशात मिंधा नाही.
बारामती : विरोधक काहीजण स्वत:वर भ्रष्टाचाराचे आरोप नसल्याचे सांगतात; पण तुम्ही मंत्री झाला तर भ्रष्टाचाराचे आरोप होतील. आमदार, खासदारांवर होतात का, भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झाले आहेत काय? एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊद इब्राहीमशी संबंध हे आरोप कोणावर झाले? असा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केला.
बारामती येथे आयोजित वकील आणि डाॅक्टरांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर प्रखर टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तुमच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नव्हती. पण आरोप तर झाले ना? बदनामी तर झाली ना? असा सवाल करीत अजित पवार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपातदेखील सत्यता नाही. विरोधक माझ्यावर आरोप करतात, पण माझं मन मला सांगतं मी कोणाच्या पाच पैशात मिंधा नाही. आताच्या खासदारांनी नजरेेत भरणारे एक काम केले असेल तरी दाखवा. मी मंजूर करून आणलेली विकासकामे त्यांच्या परिचयपत्रकात दाखविण्यात आली आहेत.
बारामतीकरांना अभिमान वाटेल अशा इमारती उभ्या केल्या. मात्र, त्याचे श्रेय दुसऱ्यानेच घेतले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.
मी कधीही भेदभाव केला नाही. चाळीस चाळीस वर्षे घरात सून येऊन तिला परकी मानले नाही. ती शेवटी घरचीच झाली ना, पण काहीजण तिला परकी मानतात. महिलांनी याबाबत बारकाईने विचार करायला हवा. कारण तुम्ही कुठे ना कुठे सून म्हणून आला आहात. तुम्ही सून म्हणून आल्यानंतर मालकीण झालात आणि घरातील वरिष्ठांनी परकी म्हटले तर तळपायाची आग मस्तकाला जाणार नाही का?, असा सवाल करीत शरद पवार यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.
सत्तेत असताना विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. खरं तर तुम्हाला वाईट वाटेल, पण कधीतरी स्पष्ट बोलताना कटू बोलावे लागते. चार वेळा मुख्यमंत्री असताना झालेले निर्णय आणि आपण पाच वेळा उपमुख्यमंत्री असताना बारामतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकलाे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी शरद पवार यांना टोला लगावला.