पुणे/चंदननगर - गेल्या दोन-तीन दिवसापासून विविध माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा कथित राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे “बाजारात तुरी" या म्हणी सारखा असल्याचे मत भाजपमधील माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी व्यक्त केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अतिशय नाट्यमयरित्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ 14 ऑक्टोबर 2019 रोजी वडगावशेरी- खराडी- चंदननगर परिसरात अजित पवार यांची सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीदरम्यान माजी आमदार बापूसाहेब पठारे हे सुनील टिंगरे यांच्यासह अजित पवारांना बरोबर प्रचारासाठी फिरत होते. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता बापूसाहेब पठारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या वर्षावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. मात्र, सातत्याने बापूसाहेब पठारे अजित पवार यांचे कट्टर समर्थक असल्याचे मानले जाते. त्यामुळेच, त्यांचा प्रवेश हा अजित पवार यांनाही ही रुचला नसल्याने अजित पवार यांनी विविध ठिकाणी सभेमध्ये हे बापू पठारे यांच्या प्रवेशाचे नाट्य सर्वत्र बोलून दाखवले होते. मात्र, वर्ष उलटल्यानंतर बापूसाहेब पठारे यांना भाजपमध्ये मानाचे स्थान दिले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ते भाजपमध्ये नाराज आहेत अशा प्रकारची चर्चा सातत्याने होत आहे. बापू पठारे पुन्हा स्वगृही परतणार अशा अनेकवेळा चर्चा झाल्या. त्यातच, बापू पठारे हे लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हमजे अजित पवारांसोबत त्यांची बैठक झाल्याचे वृत चर्चेत आहे, पण ते वृत्त निराधार असून त्यात काही तथ्य नसल्याचे बापू पठारे यांनी म्हटले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मी एकदाही अजित पवार यांना भेटलो नसून विरोधकांकडून मुद्दाम खोट्या, दिशाभूल करणाऱ्या अफवा व बातम्या पसरविल्या जात आहेत. मी भाजपमध्ये समाधानी आहे.-बापुसाहेब पठारे,माजी आमदार, वडगावशेरी विधानसभा