गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविण्याची लगबग, गणेशोत्सवाच्या खरेदीला उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:12 AM2018-09-09T01:12:07+5:302018-09-09T01:12:30+5:30
काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सावामुळे आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मयूरी गणेश आर्टच्या कारागिरांची गणेशमूर्तीवर अखेरचा हार फिरविण्याची लगबग सुरू आहे.
अवसरी : काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सावामुळे आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मयूरी गणेश आर्टच्या कारागिरांची गणेशमूर्तीवर अखेरचा हार फिरविण्याची लगबग सुरू आहे.
परिसरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची गणेशमूर्ती बुकिंग करण्यासाठी वर्दळ वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गणेशमूर्तीच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. गुरुवार, दि. १३ रोजी गणेशाची घरोघरी आणि विविध मंडळांच्या वतीने स्थापना केली जाणार आहे. त्यामुळे येथील कारखान्यात मूर्ती पसंत करून बुकिंग करण्यात कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. येथील कारखान्यात ९ इंचापासून ते १० फुटांपर्यंत गणेश मूर्ती बनविण्यात आल्या आहे. या वर्षी जीएसटीमुळे रंग, कच्चा माल, पिओपी, इंधन दरवाढ, वाहतूक खर्चामुळे या वर्षी मूर्तीच्या दरात वाढ झाली आहे. अशी माहिती मूर्तिकार श्रीधर राजगुरू यांनी दिली. मूर्ती बनविण्याचे काम जवळपास वर्षभर चालू असते. १० ते १५ कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. श्रींच्या विविध रूपातील आकर्षक मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात कारागीर मग्न आहेत. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, आसनावर बसलेल्या मूर्तींना जास्त मागणी आहे. येथे युको फ्रेंडली मूर्ती पण तयार केल्या आहेत. पुणे, नाशिक, शिरूर, चाकण, खेड, लोणी, धामणी, निमगाव सावा आदी गावांतील गणेश मंडळांनी मूर्तीची मागणी केली आहे. ५०० रुपयांपासून पुढे मूर्तीच्या किमती आहेत. लहान-मोठ्या अशा सुमारे ४ हजार मूर्ती बनविल्या आहेत. यासाठी मयूर कराळे, शशिकांत भोर, योगेश गायकवाड, अनिल जाधव, कु. मयूरी राजगुरू, स्वप्नील ढाणे, प्रशांत साळवे, दत्ता साळवे या कारागिरांनी काम केले आहे.