पुणे :पुणे लोकसभा मतदार संघातील कसबा विधानसभा मतदानासाठी सकाळपासून विविध मतदान केंद्रांवरती रांगा लागल्या होत्या. मात्र दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता. काशेवाडी, लोहिया नगर आणि दत्तवाडी या झोपडपट्टी भागांमध्ये मात्र मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली. कसबा विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. पण दुपारी एक नंतर या रांगा ओसरण्यास सुरुवात झाली. दुपारी काही मतदान केंद्र अक्षरशः ओस पडले होते.
रासने यांनी केले आंदोलन -
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे चिन्ह असलेले पंजाचे काही बॅनर मतदान सहाय्य बुथ पोलवरती लावण्यात आले होते. त्याला आक्षेप घेऊन भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांनी आंदोलन केले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर हे बॅनर काढण्यात आले.
पुणे लोकसभा तीन वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान - ३३.०७%
कसबा पेठ- ३५.२३%
कोथरूड- ३७.०२%
पर्वती- ३८.०१%
पुणे कॅन्टोन्मेंट- ३१.०१%
शिवाजीनगर- २६.६१%
वडगाव शेरी- २९.२७