पुणे : माणसाच्या जीवापेक्षा आणि जगण्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची ठरत नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देश आणि जगभरातून लोक संमेलनस्थळी येतात. सद्यस्थितीत नाशिककरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हे हिताचे नव्हे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा निर्णय योग्य आहे. संमेलनाला स्थगिती दिली तरी साहित्य रसिकांचा उत्साह कायम राहील, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महामंडळाने स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’त्यांच्याशी संवाद साधला.
जोशी म्हणाले, नाशिक येथे मार्च महिन्याच्या अखेरीस होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने स्थगित केले आहे. असा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि नाशिकच्या आयोजक संस्थेने घेतला. साहित्य संमेलन मराठी समाजाचा वाङमयीन उत्सव आहे. या उत्सवाचे जगभरातील मराठी माणसांना खूप आकर्षण असते. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाली. त्याने साहित्यरसिकांचा उत्साह वाढवला होता. कोरोना महामारीच्या जागतिक संकटात डॉ. नारळीकरांसारखे संशोधक आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजाला कोणती दिशा दाखवतात. या विषयीची जिज्ञासा सर्वसामान्य मराठी साहित्य रसिक आणि वाचकांच्या मनात होती. पण आता त्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे.
नाशिक संमेलनस्थळ ठरवताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाची पूर्वपरवानगी घेऊनच संमेलनाचे नियोजन करावे. अशी सूचना साहित्य महामंडळातील अनेक सदस्यांनी केली होती. स्थळ ठरल्यानंतर कोरोना कमी होत असल्याच्या खाणाखुणा दिसत होत्या. त्यामुळे संमेलनाची आशा वाढली होती. सद्यस्थितीत पाहता ते स्थगित करावे लागले. सहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन हे रसिकांचे मुख्य आकर्षण असते. पुस्तके पाहण्यासाठी झालेली दर्दीची गर्दी, तो उत्साह आवरणे सद्यस्थितीत कठीण झाले असते. साहित्य संमेलन स्थगित झाले तरी रसिकांचा उत्साह कमी झालेला नाही. कारण भीतीच्या सावटाखाली साहित्याचा आनंद घेणे. त्यांनाही सोयीस्कर वाटले नसते. त्यामुळे हे साहित्य रसिक वातावरण निवळण्याची निश्चितच वाट पाहतील.