पुणे : बावधन (खु) परिसरातील नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि. या सोसायटी बांधकामात मंजूर नकाशात वेळोवेळी बदल करण्यात आला आहे. या नकाशासंबंधी तपास करायचा आहे. तसेच सदनिकाधारकांकडून घेतलेल्या रकमेचा कोठे वापर केला? याचा तपास करण्यासाठी बँकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अजून उत्तर आलेले नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपी विशाल अग्रवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालसह त्याच्या अन्य साथीदारांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या अग्रवाल याला अटक करण्यात आली असून, त्याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या न्यायालयात त्याला शुक्रवारी ( दि. ५) हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.
काय आहे प्रकरण?
नॅन्सी ब्रम्हा असोसिएटस प्रकल्पाचे विकसक अग्रवाल व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केली. अगरवाल व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी विशाल अडसूळ यांच्या सोसायटीच्या मालकीच्या जागेवर वॅन्टेज टॉवर व वॅन्टेज हाय या दोन इमारती उभारल्या. यामध्ये प्रत्येक सोसायटीला एकाच ठिकाणी ॲमिनिटी स्पेस, मोकळी जागा नकाशामध्ये दर्शवून नकाशामध्ये इतर लोकांच्या मदतीने वेळोवेळी फेरबदल करून नकाशे मंजूर करून घेतले. त्याआधारे, सोसायटीच्या जागेत वॅन्टेज टॉवर या ११ मजली इमारतीत ६६ व्यावसायिक कार्यालये काढली, तर वॅन्टेज हाय या १० मजली इमारतीमध्ये २७ सदनिका व १८ दुकाने बांधून नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि. सोसायटीतील सदनिकाधारकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.