पुणे : जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा भावांवर गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे. गणेश केंजळे व महेश केंजळे (दोघे रा. शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने अधिक तपासासाठी सोमवारपर्यंत केंजळे बंधूना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी उद्योजक मिलिंद महाजन (रा. अभिलाषा अपार्टमेंट, पाषाण) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील लघुउद्योजक मिलिंद महाजन यांनी २०११ मध्ये गणेश व महेश केंजळे यांचेकडून मुळशी तालुक्यातील भुकूम येथील गट नं. ३०६ मधील २५ गुंठे जागा विकत घेतली होती. ८५ लाख रुपयांत हा व्यवहार ठरला. त्यानुसार खरेदीखत झाले. खरेदीखताप्रमाणे केंजळे यांनी एक महिन्याच्या आत ७/१२ वर महाजन यांचे नाव लावले नाही.
फिर्यादी महाजन आजारी पडल्याने उपचारासाठी त्यांनी ही जमीन विक्री करण्याचे ठरवले. मात्र, ग्राहकांना महाजन यांचे नाव ७/१२ असून त्यांच्यापुढे क्षेत्र शिल्लक नसल्याचे आढळले. गट न. ३०६ मध्ये जागेचे क्षेत्र केवळ ३ हेक्टर ५८ आर असताना ४ हेक्टर ११ आर एवढी जागा कागदोपत्री विकल्याचे तलाठी यांच्या अहवालात स्पष्ट झाले. त्यानुसार तहसीलदारांनीही निकाल दिला. केंजळे यांनी फेरफार करून अस्तित्वात नसलेली २५ आर जागा ८५ लाखाला विकल्याचे दिसून आले. तसेच खरेदी खतापोटी घेतलेले पैसे, स्टँप ड्युटी, वकील फी असे एकूण ९६ लाख १५ हजार ९४० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे अधिक तपास करत आहेत.