आंबेठाण : चाकण औद्योगिक वसाहतीत कारखाने उभारताना लागणाऱ्या मुुरूम भरावासह अन्य कामांसाठी स्थानिक युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धेतून त्यांच्यात वारंवार वादही होतात. मात्र, याचा फटका कारखानदारांना बसत आहे. फुकटचा मुरूम उचलणे आणि त्यातून लाखोंची माया जमावणाºया दोन गटांना सांभाळताना उद्योजकांच्या नाकीनऊ आले आहेत.चाकण आणि परिसरात एमआयडीसीचे चार टप्पे झाले, तर पाचवा टप्पा प्रस्तावित आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. नव्याने कारखाने उभारताना भरावासाठी मुरूम आवश्यक असतो. एखाद्या गावाच्या हद्दीत कारखाना आला, तर त्याच गावातील युवक तेथे ठेके मिळवतात. मात्र, ते घेताना कारखानदारांना दमबाजी केली जात असल्याचा अनुभव येत आहे. ज्यांच्या जमिनी एमआयडीसीसाठी गेल्या, त्यांना अशा प्रकारच्या विविध कामांची संधी मिळणे क्रमप्राप्त आहे; परंतु त्यांना बाजूला सारून दादागिरी करीत अनेक तरुण कामे मिळण्यासाठी उद्योजकांवर दबाव टाकत आहेत.भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त असल्याने स्थानिकांना औद्योगिक वसाहतीत नोकरी आणि व्यवसाय मिळणे हे जरी महत्त्वाचे असले, तरी कारखानदारांना त्यासाठी वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. मनाला वाटेल ते दर लावणे आणि सेवा पुरवताना स्वत: नाही तर अन्य कोणीही नाही, असे सूत्र ठेवत असल्याने लहानमोठे उद्योजक हैराण झाले आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीत महिंद्रा, ब्रिजस्टोन, टेट्रापॅक, कॉर्निंग इंडिया, सिंड्रेल, बजाज, बडवे आॅटो या बड्या कंपन्यांसह अनेक नामवंत कंपन्या स्थिरावल्या आहेत. याखेरीज, त्यांच्यावर अवलंबून असणाºया अनेक लहानमोठ्या व्यावसायिकांनीही आपापले व्यवसाय उभारले आहेत. स्थानिकांसह राज्य आणि परराज्यातील लाखो हातांना रोजगार मिळाला आहे. मिळालेल्या रोजगारात एमआयडीसीसाठी जमीन गेलेल्या आणि स्थानिक तरुणांचे प्रमाण नगण्य आहे.परंतु, ज्यांना काही प्रमाणात या एमआयडीसीत कामाचे ठेके मिळाले आहेत, असे व्यावसायिक कारखानदारांना मनायोग्य दर मिळविण्यासाठी वेठीस धरत आहे. नव्याने येणारे गुंतवणूकदार, व्यावसायिक यांना वेठीस धरण्याचे प्रमाण मोठे आहे. ‘जमीन सपाटीकरणासाठी मशीन माझीच घ्या, मुरूम भराव मीच करणार, कंपनीत चहा-नाष्टा मीच पुरविणार, पाण्याचा टँकर माझाच घेतला पाहिजे, कंपनीत लागणारी क्रेन, बस यांसह लहानमोठी वाहने पुरविण्याचे कामे मलाच मिळाली पाहिजे,’ अशा प्रकारचा दवाब कारखानदारांवर टाकला जात आहे. त्यासाठी अवाच्या सवा दर मागितला जात असून, त्यापेक्षा कमी दराने कोणी सेवा पुरवत असेल, तर त्याला धमकावले जात आहे.उद्योजकांकडून कारवाईची मागणीकंपनीचा कर्मचारी अशा दबावाला बळी पडणारा नसला, तर त्याला वाटेत अडवून मारहाण केली जाते. ज्यांची जमीन एमआयडीसीत गेली नाही, असे लोक कधी कंपनी अधिकाºयांना हाताशी धरून तर कधी धमकावून व्यवसाय मिळवू पाहत आहेत. परिणामी, प्रकल्पग्रस्त युवक आणि त्यांच्यात खटके उडत असून त्याचे पर्यवसान भांडणात होत आहे. त्यामुळे धमकावून काम मागणाºया व्यावसायिकांवर कारवाईची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.
चाकणमध्ये उद्योजकांना धाकदपटशा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:56 AM