पुणे : काल ( मंगळवार) आश्रमात संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्याने शेकडो ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट तोडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता सन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला आहे. प्रसंगी अटक होण्याची तयारी अनुयायांनी ठेवली आहे. सध्या हे ओशो अनुयायी आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करत आहेत.
कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाचे राष्ट्रीय स्मारक करावे, या मागणीसह ओशो संबोधी दिवशी सर्वांना आश्रमात प्रवेश दिला जावा, अशी मागणी करत आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन मंगळवारी ओशो आश्रमात सर्वांना प्रवेश देण्यात आला होता. ओशो यांची प्रतिमा असलेली माळ घालून भाविकांनी प्रवेश केला होता. पण आज पुन्हा प्रवेश नाकारण्यात आला, त्यामुळे ओशो अनुयायांनी व्यवस्थापनाचा निषेध करत आंदोलन केले.
२१ मार्च हा दिवस ओशो संबोधी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. गेल्या ३० वर्षांपासून आश्रमामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. आंदोलनाची दखल घेऊन आश्रमाच्या ट्रस्टींनी मंगळवारी सर्व भाविकांना प्रवेश दिला. त्यामुळे ओशो अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पण आज पुन्हा अनुयायांना आश्रमात प्रवेश नाकारण्यात आला.