पुणे : पर्यावरणासंदर्भात असलेली कोणतीही तक्रार ई-मेलद्वारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) दाखल करता येणार आहे. ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच एनजीटीचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल यांनी दिले आहेत.युशिकागो सेंटर नावाच्या संस्थेने दिल्लीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत गोयल यांनी ही माहिती दिल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले. देशातील विविध भागांत असलेल्या नागरिकांना पर्यावरणाची नासधूस केल्याबाबतच्या तक्रारी ई-मेलद्वारे आॅनलाईन पाठविण्याची व्यवस्था केल्यावर कुणीही स्वत:च्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरून त्वरित तक्रार करू शकेल. त्यावर निर्णयसुद्धा आॅनलाईन देण्यात येईल, अशी आशाही न्या. गोलय यांनी व्यक्त केली आहे.न्या. गोयल यांची एनजीटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. तरही अजून नवीन कायदेतज्ज्ञ सदस्य न्यायाधीश व तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे कमीतकमी २१ न्यायाधीश आणि जास्तीतजास्त ४१ न्यायाधीश व तज्ज्ञ व्यक्तींच्या नेमणुका त्वरित कराव्या, अशी मागणी एनजीटी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असीम सरोदे यांनी केली आहे.
पर्यावरणासंदर्भातील तक्रारी आता ई-मेलद्वारेही करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 4:56 AM