पुणे : शालेय विद्यार्थी, डॉक्टर, बिल्डर, पोलीस निरीक्षक, माहिती तंत्रज्ञान तज्ञ, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या १७ जणांनी एकत्र येत सायकलवरुन पुणे ते गोवा (कोस्टल मार्ग) असा ५५५ किमीचा प्रवास करतानाचा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्याचबरोबर सायकलसारख्या वाहनांचा वापर करुन अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा वापर वाढविण्याचे आवाहन केले.
कोथरुड येथील अनुसंधा अॅडव्हेंचर या संस्थेने आयोजित केलेल्या सायकल सफरीत समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, त्यांचा मुलगा गौरांग ताम्हाणे, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या शल्य चिकित्सक स्वप्ना आठवले, उद्योजक अमोल व प्राची उपळेकर, चार्टर्ड अकाऊंटंट विजय अनपट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ डॉ. भीमाप्पा देसाई, अनिकेत जोशी, रणजित, सीमा ननवरे, प्रसाद खांडेकर, शिला नगरकर व त्यांचा मुलगा आकाश नगरकर, सुधा कानडे, निलाक्षी बक्षी या तीन बहिणी अशा विविध क्षेत्रातील सायकलपटूंनी हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. यात वय वर्षे १४ ते ५६ वर्षापर्यंतच्या वयोगटातील विविध क्षेत्रातील १७ सायकलपटू सहभागी झाले होते.
पुण्यातून ६ डिसेंबर रोजी हा प्रवास सुरु झाला. रोज साधारण १०० पेक्षा अधिक किलोमीटर सायकल चालविणे. नंतर तिथेच एका गावात मुक्काम आणि दुसर्या दिवशी भल्या पहाटे पुन्हा पुढचा मार्गक्रमण हा त्यांचा नित्य नियम झाला. पुणे - महाड -गुहागर - पावस - देवगड - मालवण - गोवा असा ५५५ प्रवास या गटाने ११ डिसेंबर रोजी पूर्ण केला.
आपल्या सायकल प्रवासात त्यांनी विविध ठिकाणी थांबून सायकल प्रवासाचे महत्व, पर्यावरण पुरकता तसेच दैनंदिन व्यायामाचे महत्व, इकोटुरिझम या गोष्टींचे सध्याच्या काळात असलेले महत्व स्थानिक लोकांपर्यंत पोहचविले. या सायकल प्रवासाविषयी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी सांगितले की, हा एक विलक्षण वेगळा अनुभव होता. या सायकल प्रवासासाठी गेल्या ४ महिन्यांपासून तयारी करीत होतो. या उपक्रमासाठी सुट्टी मिळावी, म्हणून दिवाळीत सुट्टी नको असे पोलीस उपायुक्त कविता नारनवरे यांना सांगितले होते. त्यांनीही तातडीने या उपक्रमासाठी सुट्टी मंजूर केली. त्यामुळेच हे शक्य झाले.
गेल्या ४ महिन्यांपासून शनिवार, रविवार भोर, लवासासह शहरालगतच्या विविध घाटापर्यंत सायकल चालविण्याचा सराव करीत असे. या प्रवासातच चढाच्यावेळी कोणता गिअर वापरावा, उताराच्या वेळी कोणता गिअर वापरावा याचे मार्गदर्शन १४ वर्षाच्या मुलाकडून मिळाले. चढावर सायकल चालविताना मोठे कष्ट घ्यावे लागतात. तर उतार आल्यावर सायकल चालविण्याची मौज वेगळीच असते. जीवनातही तसेच आहे. जीवनात संघर्षाचे अनेक प्रंसग येतात. त्यातून निभावून जाण्यासाठी मोठी कष्ट करावे लागतात. मात्र चांगले दिवसही येत असतात़ त्याचा आनंद घ्यायचा असतो. जीवनाचे हे तत्वज्ञान सायकल प्रवासात मुलाच्याही मनावर बिंबविण्यात यश आले, याचा आनंदही मिळाला, असे विष्णु ताम्हाणे यांनी सांगितले.