पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाची माेठ्याप्रमाणावर हानी हाेत अाहे. पर्यावरणाचा समताेल राखणे अावश्यक अाहे. परंतु अनिर्बंध बांधकामे, कारखान्यांची वाढती संख्या अाणि नद्यांमध्ये साेडले जाणारे सांडपाणी यांमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास हाेत अाहे. त्यामुळे अाता नागरिकांना पर्यावरणासंदर्भातील काेणतीही तक्रार असेल तर त्याबाबत यापुढे इमेलद्वारेसुद्धा तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया लवकरच सुरु करण्यात येणार अाहे. याबबातची माहिती राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. अादर्शकुमार गाेयल यांनी दिली.
या नव्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या ईमेलद्वारे तक्रार नाेंदवता येणार अाहे. यातून नागरिकांचा वेळ वाचणार असून तक्रारीवर कारवाई करणेही साेपे हाेणार अाहे. युशिकागाे सेंटर या संस्थेने दिल्लीत अायाेजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत गाेयल यांनी ही माहिती दिली. गाेयल यांनी सांगितले की भारतातील कानाकाेपऱ्यात असलेल्या नागरिकांना पर्यावरणाची नासधूनस केल्याबाबतच्या तक्रारी अाॅनलाईन ईमेलद्वारे पाठविण्याची व्यवस्था केल्यावर कुणीही स्वतःच्या माेबाईल किंवा लॅपटाॅपवरुन त्वरीत तक्रार करु शकणार अाहे. त्यावर अाॅनलाईन निर्णयसुद्धा देण्यात येणार अाहे.