पुणे : किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकारातून विविध पर्यावरणवादी संस्थांच्या सहकार्याने आयोजित १४ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. देबल देब यांना ‘वसुंधरा सन्मान’ प्रदान करण्यात आला.अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते डॉ. देब यांना पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन या सन्मानाने गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य कौशिक, आरती किर्लोस्कर, गौरी किर्लोस्कर, महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि संयोजक वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते.आजवर ज्या मान्यवर व्यक्तींना हा ‘वसुंधरा सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्या सन्मानाच्या यादीत माझे नाव समाविष्ट झाले याचा विशेष आनंद असल्याची भावना डॉ. देबल देब यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, शेतीचे शाश्वत उद्दिष्ट गाठण्यासाठी शेतीचे पारंपारिक ज्ञान आणि बी-बियाण्यांशिवाय पर्याय नाही. मात्र, कृषीतज्ज्ञ आणि कृषी धोरणकर्ते पारंपारिक बी-बियाण्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी उद्योजकांना पूरक ठरतील अशी धोरणे आखत आहेत. केवळ तांदूळच नव्हे तर केळी, बटाटे आदी उत्पादनांच्या बाबतीतही तशीच दिसून येतात. अति पाऊस, समुद्राचे पाणी, दुष्काळ किंवा केवळ पावसाच्या पाण्यावर तग धरू शकतील अशा प्रजाती आम्ही बासुधा फार्म्सच्या माध्यमातून विकसित केल्या आहेत. त्याच्या बी-बियाण्यांच्या आदन-प्रदानाच्या माध्यमातून शून्य अवलंबित्वाकडे वाटचाल करीत आहोत. जैवविविधतेचे स्थानिक ज्ञान आणि त्यावरील उपयोगांबद्दल केलेल्या अभ्यासातून मला असे वाटते की, केवळ पर्यावरणीय शेतीच नाही तर पर्यावरणीय वास्तूशास्त्र, जैवविविधता आणि पर्यावरणाशी संबंधित जीवनशैली देखील टिकली पाहिजे.यावेळी एन्ड्रीएस एवल्स दिग्दर्शित ‘द पायथन कोड’ हा समारोपाचा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच या महोत्सवानिमित्त आयोजित किर्लोस्कर जी.सी.सी. ट्रॉफी, पथनाट्य स्पर्धा, प्रश्न मंजूषा स्पर्धा, रामनदी फोटो वॉक आणि रामनदी युवा संसद अशा विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.गौरी किर्लोस्कर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर त्रिवेणी माथूर यांनी सूत्रसंचालन केले. -----------------------------------------------------------
पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. देबल देब यांना ‘वसुंधरा सन्मान’ प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 9:47 PM
कृषीतज्ज्ञ आणि कृषी धोरणकर्ते पारंपारिक बी-बियाण्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी उद्योजकांना पूरक ठरतील अशी धोरणे आखतात..
ठळक मुद्देअतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते डॉ. देब यांना पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान