लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या चार वर्षांत पुण्यात ८६६ पर्यावरणपूर्वक बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल झाल्या. पुणेकरांना गतिमान, अत्याधुनिक आणि सुरक्षित प्रवासाची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्यातील वायुप्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडू नये, यासाठी पुणे महानगरपालिकेने जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय आता प्रत्यक्षात येऊ लागले आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात पर्यावरणपूरक बस दाखल झाल्या आहेत. आगामी काळात डिझेल बसची खरेदी न करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘पीएमपीएमएल’ने घेतला आहे. सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या डिझेलच्या बसगाड्या पूर्णत: बाद करण्याच्या प्रक्रियेसही गती आली आहे. पुण्यासह देशातील प्रमुख महानगरांमधील हवेतील पीएम २.५ आणि पीएम १०या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण २०२४ पर्यंत २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा’चे (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) लक्ष्य आहे.
पुणे शहरातील वायुप्रदूषणामध्ये तब्बल ४९ टक्के वाटा वाहतुकीचा असल्याचे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिओरॉलॉजी’ (आयआयटीएम), ‘सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट एज्युकेशन’ (सीईई), ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ’ (आयआयपीएच) आणि ‘नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल’ (एनआरडीसी) या संस्थांनी एकत्रित केलेल्या ‘एअर पोल्यूशन इन पुणे’ या अहवालात नमूद केले आहे. पुणे शहरातील वायुप्रदूषणात १९९९ पासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या २० वर्षांत पीएम २.५ घटकांच्या प्रमाणाची वार्षिक सरासरी चढत्या भाजणीचीच राहिली आहे. पुणेकरांच्या आरोग्यावरील हा धोक्याचा इशारा गांभीर्याने घेत पुणे महानगरपालिकेने ठोस निर्णय घेतले.
पीएमपीएमएलच्या ताफ्यातून डिझेल बस हद्दपार करणे आणि सीएनजी व इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविणे, या दोन महत्त्वाच्या निर्णयांच्या अंमलबजावणीस आता वेग आला आहे. ‘पीएमपीएमएल’चे माजी संचालक व शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले, की शहराची प्रदूषणाची पातळी नियंत्रणात राहावी, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिझेलच्या बसगाड्या घेऊ नका. इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेनाच प्राधान्य द्या, अशी आग्रही भूमिका घेतली. यानुसार गेल्या चार वर्षांत ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात दीडशे इलेक्ट्रिक आणि चारशे सीएनजी बसगाड्या दाखल झाल्या आहेत. याशिवाय, ४६६ सीएनजी बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत डिसेंबर २०२१ पर्यंत १५० नव्या इलेक्ट्रिक बस ‘पीएमपीएमएल’ला दिल्या जातील. तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या माध्यमातून साडेतीनशे इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल होतील. एक इलेक्ट्रिक बस तीन तासांच्या चार्जिंगनंतर दोनशे किलोमीटर अंतर कापते. त्यामुळे डिझेलच्या खर्चात कपात झाली आणि प्रदूषणातही घट झाली आहे.
चौकट
चार्जिंग स्टेशन्स विचाराधीन आगामी काळात इलेक्ट्रिक बसगाड्यांची संख्या वाढणार असल्याने ‘पीएमपीएमएल’च्या स्थानकांवरच चार्जिंगची सुविधा विकसित करण्यास सुरुवात झाली आहे. खासगी इलेक्ट्रिक वाहनांची संख्याही आता वाढीस लागत असून, भविष्यात ‘पीएमपीएमएल’च्या चार्जिंग स्टेशन्सवर खासगी वाहनांसाठीही सशुल्क चार्जिंगची सुविधा देण्याचे ‘पीएमपीएमएल’च्या विचाराधीन आहे.
चौकट
‘पीएमपीएमएल’चा पर्यावरणपूरक ताफा
८६६ नव्या सीएनजी बसगाड्या नागरिकांच्या सेवेत येत आहेत. पाचशे नव्या इलेक्ट्रिक बस डिसेंबर २०२१ पर्यंत ताफ्यात येणार तर १९७ डिझेल बस ताफ्यातून बाद होणार आहेत.
कोट :
‘शहरांचा शाश्वत विकास’ हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून नरेंद्र मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सार्वजनिक वाहतुकीसाठी आधुनिक धोरण अंगीकारले. या धोरणांचे सुखद परिणाम पुणेकर नजीकच्याच भविष्यात अनुभवू शकतील. – हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती