पुणे : कोरोनाच्या संकटाने सामाजिक, आर्थिक, भावनिक स्तरावर अक्षरश: उलथापालथ घडवली आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूमुळे महामारीच्या काळात सामान्यांचे जगण्याचे गणितच बदलले. एकीकडे आजारपणाची भीती, तर दुसरीकडे जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष सर्वांनीच अनुभवला. या भयावह काळातील भावनिक गुंतागुंत दर्शवणारा ‘वबा - अ पॅनडेमिक’ हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुण्यातील कदीर करनालकर यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन आणि संकलन केले आहे. मुंबई, पुण्यासह गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल होण्यासाठी लघुपट सज्ज झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संकटाला जागतिक महामारी घोषित केले. कोरोनाच्या संकटाने धावते जग थांबले. या काळातील गंभीर आणि भावनिक क्षण चितारण्याचा प्रयत्न कदीर यांनी ‘वबा’ या लघुपटात केला आहे. ‘वबा’ हा उर्दू शब्द असून, त्याचा अर्थ ‘महामारी असा’ होतो, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली.
लघुपटामध्ये कदीर यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. लघुपट सुमारे १२ मिनिटांचा असून, लॉकडाऊनमध्ये व्हीएफएक्सच्या साह्याने चित्रीकरण आणि तांत्रिक गोष्टी पार पडल्या. चार महिन्यांत लघुपट तयार झाला. रफीक काझी यानेही लघुपटात छोटी भूमिका साकारली आहे. राजेंद्र शेकटकर हे लघुपटाचे सहनिर्माता आहेत. तुषार कडू, रमेश यादव, अंकुश बिडकर यांनी निर्मिती प्रक्रियेत सिंहाचा वाटा उचलला आहे. छायाचित्रण सज्जाद करनालकरचे आहे.
कदीर करनालकर म्हणाले, “मी सुरुवातीपासून संकलन, छायाचित्रणाच्या क्षेत्रात काम करतो. कोरोना काळातील घटना, सामान्यांना भोगावे लागलेले दु:ख, भावविश्वात झालेली उलथापालथ याचे दस्ताऐवजीकरण व्हावे, हा लघुपटामागचा उद्देश आहे. लघुपट महोत्सवांसाठीही तो पाठवण्यात येत आहे.”