पुणे : गानवर्धन संस्थेतर्फ ज्येष्ठ कथक गुरू पंडिता डॉ. सुजाता नातू यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ३०) त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुरेश नातू, गानवर्धन संस्थेचे कार्याध्यक्ष दयानंद घोटकर आदी उपस्थित होते.
धर्माधिकारी म्हणाले की, पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला साजेसे कार्यकर्तृत्व कथक नृत्य क्षेत्रात करून या कलेला पुण्यात समाजमान्यता मिळवून देण्यात त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. तपस्या आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डाॅ. सुजाता नातू होय.
“या सत्काराने मी भारावून गेले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोणी कोणाला भेटू शकत नाही. जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आहे, तरीदेखील ‘गानवर्धन’ने घडवून आणलेला हा सत्कार मी घरातल्या लोकांनी केलेले काैतुक या भावनेतून स्वीकारते,” असे मनोगत डॉ. सुजाता नातू यांनी व्यक्त केले. सुरेश नातू यांनी मनोगत व्यक्त केले. घोटकर यांनी सूत्रसंचालन केले. सविता हर्षे यांनी आभार मानले.