पुणे : आपण कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. परंतु, विकृत विचारांच्या विरोधात संघर्ष करताना विचारांनीच विचारांची लढाई लढण्याची खबरदारी घेण्याची गरज असून, समतेवर आधारित विचारधारा रुजविण्याचा निर्धार करा,’ असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला दिला. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवसन्मान गौरव सोहळा आणि विशेष सत्कार समारंभात ते बोलत होते. ‘पद्मविभूषण’ जाहीर झाल्याबद्दल मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते शरद पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीचे पी. ए. इनामदार, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रमोद मांडे, रमेश राक्षे, विठ्ठल गायकवाड, अॅड. मिलिंद पवार आणि वृषाली रणधीर यांना ‘शिवसन्मान’ गौरवाने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण आणि शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर उपस्थित होते. इतिहासासंबंधीचे विश्लेषण करताना विकृत स्वरूपाचा इतिहास पोहोचविण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शब्दांचा उल्लेख असा काही केला जातो, की त्या शब्दांच्या माध्यमातून विकृत विचारांची बीजे पेरली जात आहेत. गांधीवध झाला असे म्हटले जाते; मात्र वध दैत्यांचा आणि वाईट प्रवृत्तींचा केला जातो. हत्येसंदर्भात वध हा शब्द वापरला जातो, त्यामागे गांधीजींविषयी असलेला आकस आणि द्वेषाची भावना प्रतित होते, अशा शब्दांत महात्मा गांधी यांच्याविरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या वृत्तीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला तसेच छत्रपती शिवाजीमहाराज हे धर्माच्या विरुद्ध नव्हते, त्यांच्यात धार्मिक विद्वेषाची भावना नव्हती. तरीही ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असल्याचे सांगून विद्वेषाची भावना समाजात पसरविली जात असल्याचे सांगत पवार यांनी इतिहासाच्या विकृतीकरणावर टीकास्त्र सोडले. खेडेकर यांनी महाराष्ट्र आणि बाहेरील भागात सामाजिक चळवळीच्या माध्यमातून वास्तववादी इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेतली, अशी स्तुतिसुमनेही त्यांनी खेडेकर यांच्यावर उधळली. वाचनसंस्कृती पोहोचविण्याची खबरदारी तर घेतलीच पाहिजे; पण आपण काय वाचायला देतो याचे तारतम्य बाळगा, असेही ते म्हणाले.
समतेची विचारधारा रुजवा
By admin | Published: February 16, 2017 3:18 AM