लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजपूत समाज विविध ठिकाणी विखुरलेला आहे. या समाजाने एकत्र आले पाहिजे. सामाजिक एकता म्हणजेच राष्ट्राची एकता आहे. अशी एकजूट कायम असू द्या. असेच विविध कार्यक्रम पुढील काळात राबविणार आहोत. महाराणा प्रताप उद्यानात अश्वारूढ पुतळा बसवावा, अशी मागणी समस्त राजपूत समाज अंकित राजपूत सोशल वॉरिअर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर रजपूत यांनी केली.
कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतांवर अंत्यसंस्कार व अस्थिविसर्जन करणाऱ्या योद्ध्यांचा महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सन्मान केला. संगम पुलाखाली असलेल्या घाटावर विनामूल्य अस्थिविसर्जन करणाऱ्या बापू तिकोने, जगन तिकोने, जीवरक्षक राजेश काची आणि कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या जावेद खान यांच्यातील माणुसकी व कर्तव्याला राजपूत समाजातील बांधवांनी सलाम केला.
समस्त राजपूत समाज अंकित राजपूत सोशल वॉरिअर्स या संस्थेने महाराणा प्रताप यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त उत्सवाचा खर्च टाळून योद्ध्यांचा सन्मान, १ हजार ऑक्सिजन पोर्टेबल कॅन सिलेंडर, धान्य मदत व आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध करुन दिल्या. या उपक्रमांचा शुभारंभ थोरले बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे केला. या वेळी उद्यानातील महाराणा प्रताप यांच्या जीवनपटावर आधारित माहिती फलकाचे अनावरण देखील झाले.
महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी महापौर प्रशांत जगताप, विशाल धनवडे, अमित गायकवाड, अॅड. प्रताप परदेशी, डॉ. मिलिंद भोई, दीपक नागपुरे, उमेश चव्हाण, युवराज काची, स्वप्निल नाईक उपस्थित होते. तर शैलेश बढाई, गोपी पवार, प्रमोद राणा, गणेश काची, उमेश काची, सोमनाथ परदेशी, सुनील परदेशी, डॉ. गणेश परदेशी, राजू परदेशी, संजय परदेशी, विजय परदेशी, प्रशांत बढाई, घनश्याम बढाई, राजाभाऊ रजपूत, प्रेम राठोड, किशोर परदेशी, सुदेश काची, विजय रजपूत आदींनी उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.