पुणे : कोरोना आपत्तीचा प्रभाव कमी झाल्यावर एकापाठोपाठ एक शहरातील महापालिकेची कोविड केअर सेंटर (सीसीसी) तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले होते़ परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने मार्च महिन्याच्या अखेरीस शहरात पुन्हा तीन कोविड सेंटर सुरू करण्यात आले़ मात्र, हे कोविड सेंटर सुरू करण्यापूर्वी सेंटरमधील सर्व व्यवस्था विशेषत: विद्युतविषयक, अग्निशामक विषयक कामांची सुसज्जता करण्यात आली आहे़
शहरात सध्या महापालिकेचे येरवडा येथील संत ज्ञानेश्वर सभागृह, हडपसर येथील बनकर शाळा व खराडी येथील रक्षकनगर स्टेडियम येथे कोविड केअर सेंटर सुरू आहेत़ मुंबईत मॉलमधील कोरोना रुग्णालयाला आग लागण्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेने हे सेंटर सुरू करताना प्रथम येथील इलेक्ट्रिक व फायर ऑडिट आपल्या विभागांमार्फत करून घेतले आहे़
महापालिकेचे विद्युत अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर सेंटर करण्यापूर्वी प्रत्येक सेंटरचे इलेक्ट्रिक ऑडिट करण्याची जबाबदारी तीन कनिष्ठ विद्युत अभियंता यांना देण्यात आली होती़ त्यांनी येथील काम प्रमाणित केल्याचा दाखला दिल्यावर मालमत्ता विभागास येथे सेंटर सुरू करण्यास सांगितले आहे़
शहरात जम्बो कोविड हॉस्पिटल व बाणेर येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्येच रुग्णसंख्या कमी असल्याने ज्यांना कोविड केअर सेंटरची आवश्यकता होती, त्यांना दाखल करून घेण्यात येत होते़ परंतु सध्या तीन कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने, केवळ जम्बो हॉस्पिटलमध्ये ५० रुग्ण की ज्यांना ऑक्सिजनसह उपचाराची गरज नाही, असे आयसोलेशेनमध्ये आहेत़
रुग्णालयांशिवाय इतर इमारतींमध्ये सुरू असलेले कोविड केअर सेंटर -
कोविड केअर सेंटर क्षमता :- संत ज्ञानेश्वर सभागृह (क्षमता : २००), हडपसर येथील बनकर शाळा (३००) व खराडी येथील रक्षकनगर स्टेडियम (२५०)़
दाखल रुग्णांची संख्या :- ६३१
-----------------------
महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करताना, तेथील विद्युत व फायर ऑडिटचे काम आपल्या कनिष्ठ अभियंत्याव्दारे केले आहे़ तसेच फायर ऑडिट करतानाच प्रत्येक ठिकाणी छोटी अग्निरोधक यंत्रणा येथे उभारण्यात आली आहे़
- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता विद्युत विभाग पुणे मनपा़
----------------------