पोलीस दल सुसज्ज करणे ही राज्य शासनाची प्राथमिकता- उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 15:18 IST2025-02-01T15:17:56+5:302025-02-01T15:18:12+5:30
सर्वांच्या प्रयत्नातून आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया, असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

पोलीस दल सुसज्ज करणे ही राज्य शासनाची प्राथमिकता- उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन सुसज्ज करणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नातून आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया, असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
पोलीस उपमुख्यालय बऱ्हाणपूर येथे पोलीस विभागाकरीता ४ स्कॉर्पिओ वाहनांचे लोकार्पण तसेच तालुक्यातील नागरिकांना त्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक पकंज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बऱ्हाणपूरचे सरपंच बाळासाहेबत चांदगुडे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील नागरिकांचा चोरी गेलेला एकूण १६ लाख ३३ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तांरित करण्याच्या कार्यक्रमामुळे पोलीस दलाप्रती नागरिकांच्या मनात विश्वास अधिक वृद्धींगत होणार आहे. परिसरात अनुचित प्रकार घडत असल्यास पोलीसांना कळवावे, नागरिकांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने शक्ती अभियानाअंतर्गत शक्ती पेटी विविध भागात ठेवण्यात आल्या आहेत. तक्रारदारांची नावे गोपनीय ठेवून पोलीस योग्य ती कारवाई करीत आहेत,असे पवार म्हणाले.
पोलीस अधिक्षक देशमुख म्हणाले, नागरिकांचा चोरी गेलेला विविध प्रकारच्या मुद्देमालाचा शोध घेवून तो नागरिकांच्या ताब्यात देण्यात येत आहे, याबाबत जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख म्हणून आपल्याला सार्थ अभिमान आहे, असेही देशमुख म्हणाले.
अपर पोलीस अधिक्षक बिरादार म्हणाले, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने बऱ्हाणपूर येथे सर्व सुविधांयुक्त पोलीस उपमुख्यालय एक प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प म्हणून उभारण्यात आलेला आहे. या उपमुख्यालयाची ख्याती राज्यभर आहे. पोलीस दलाला आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. बारामती उपविभागांतर्गत १०० दिवस कार्यक्रमात नागरिकांना मुद्देमाल परत करणे, इमारतीची साफसफाई आदी कामे करण्यात येत आहे, असे बिरादार म्हणाले. यावेळी पवार यांच्या हस्ते बारामती वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृतीपर माहितीपत्रिकेचे लोकार्पण करण्यात आले.
...३८ लाख रुपयांच्या दोन ड्रोन प्रतिबंधक बंदूकीला मंजुरी
ग्रामीण भागात ड्रोन फिरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी व भीती लक्षात घेऊन जिल्हा ग्रामीण पोलीस दलालाकरीता ३८ लाख रुपयांच्या दोन ड्रोन प्रतिबंधक बंदूक (अँटी ड्रोनगन) खरेदीकरीता मंजूरी देण्यात आली आहे, जिल्ह्याचे कार्यक्षेत्र विचारत घेवून आणखीन दोन ड्रोन प्रतिबंधक बंदूक उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.