इंदापूर : कर्जमाफीबाबतच्या शेतक-यांच्या यादीत त्रुटी असल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली देत पात्र थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असा आपला आग्रह आहे. याबाबत सहकार विभागाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे पत्र आपण सहकार मंत्रालयास देणार आहोत, अशी माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी (दि.२६) इंदापूरला पत्रकार परिषदेत दिली.आमच्या सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणात काही त्रुटी असू शकतील. त्या शोधून दुरुस्त केल्या जातील. बँकेकडून मिळणाºया व लोकांमधून मिळणाºया माहितीमध्ये फरक पडतो आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. कर्जदार, थकबाकीदार व नियमित कर्ज भरणारा मात्र सध्या अडचणीत असणारा असा एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित रहाणार नाही, अशी ग्वाही दिली.खोत म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समित्या या सभापती व उपसभापतींच्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठीच स्थापन झाल्या आहेत की काय, असे वाटावे, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हिताला प्राधान्य देतील अशा स्वरुपाच्या बाजार समित्या निर्माण करण्याचे काम सध्या हाती घेतले आहे. खासगी स्वरूपात बाजार समित्या स्थापन करण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. बाजार समित्यांनी या स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिज, असे मत त्यांनी व्यक्त केले.या वेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक भोसले, प्रा. सुहास पाटील, बाळासाहेब पाटील, चित्तरंजन पाटील, हर्षल पाटील, संदीप पाटील, इंदापूरचे तालुकाध्यक्ष नीलेश देवकर, बळीराम गायकवाड व इतर उपस्थित होते.गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणीशेजारच्या घरात चांगले चालले असेल तर त्यांचा दुस्वास न करता आशीर्वाद देण्याएवढं मोठ मन ठेवावे. ते काही जणांकडे नसतं अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी खासदार राजू शेट्टी यांना लक्ष्य केले. वाटा अलग झाल्या, काही हरकत नाही. मी मैदानातला, लढाईतला, संघर्षातला माणूस आहे. जनता हे आमचे परीक्षा केंद्र आहे. अतिशय थातूरमातूर विषय तयार करून एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून काढून टाकलं. त्या निर्णयाचेही आम्ही खुल्या मनाने स्वागत केले. कारण आम्हालाही या कंपनीत राहायचे नव्हते. पुन्हा कधी दोघे एकत्र येणार का? या प्रश्नावर स्मितहास्य करत ‘गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी’ एवढीच सूचक प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.
कर्जमाफीच्या शेतक-यांच्या यादीत त्रुटी?, सहकार विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 1:42 AM