- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : सांस्कृतिक ज्ञानकोशाच्या माध्यमातून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने महाभारताविषी सविस्तर आणि साधार माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारतातील भौैगोलिक, राजकीय, अर्थशास्त्रीय वैैशिष्टये, कला, वास्तूशास्त्र, संस्कृती या कोशामधून अधोरेखित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभ्यासक प्रा. ग. उ. थिटे संपादकपदाची धुरा सांभाळत आहेत. सांस्कृतिक ज्ञानकोशाच्या पहिल्या दोन खंडांत महाभारतामध्ये उल्लेख असलेल्या भौगोलिक भागातील नद्या, पर्वते, तीर्थस्थाने आणि शस्त्रास्त्रे या विषयांची सूची संकलितकरण्यात आली आहे. सध्या तिसऱ्या खंडाचे काम सुरु आहे. व्यक्तिविशेष या खंडातील पहिल्या दोन भागांमध्ये अ पासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्तिरेखांची सूची संकलित करणत आली आहे. लोकमतशी बोलताना डॉ. थिटे म्हणाले, महाभारतातील कथा, प्रसंग, घटना आपण विविध माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. आपल्याकडे मोघम माहिती असते. मात्र, या घटना महाभारतात नेमकेपणाने कोठे मांडलेल्या आहेत, कथेचे तपशील याबद्दल विवेचन करण्यात येत आहे. संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सर्व मुद्दयांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अनेक उपखंड मिळून एक खंड तयार होईल आणि कामाच्या विस्तारानुसार, खंडांची संख्या ठरु शकेल, असेही त्यांनी नमूद केले.----------------
व्यक्तिविशेष भाग :
व्यक्तिविशेष भागामध्ये काही ठिकाणी शंकर, विष्णू यांची सहस्त्रनामावली देण्यात आलेली आहे. यामुळे कोणता शब्द मूळ ग्रंथात कोठे आणि किती वेळा आलेला आहे, याचीही माहिती मिळू शकेल. यामुळे अभ्यासकांची सोय होणार आहे. अक्षरानुसार, व्यक्तीरेखांची यादी करत जाऊच; मात्र, काही व्यक्तींना एकाहून अधिक नावे आहेत. उदाहरणार्थ, अजुनार्चा उल्लेख काही ठिकाणी धनंजय, तर काही ठिकाणी पार्थ असा आहे. महाभारतातील अधिविशेषणे यामध्ये संकलित करण्यात आली आहेत. किती आणि कोणकोणती नावे, विशेषणे आणि अधिविशेषणे किती ठिकाणी, कशी वापरली आहेत, याचे संकलन हाच कोशाचा मूळ उद्देश आहे. विखुरलेली माहिती एकत्रित करण्यात येत आहे.
------------------
चिकित्सित आवृत्ती - हा कोश तयार करण्याआधी भांडारकर संस्थेने महाभारताची चिकित्सित आवृत्ती तयार करण्याचे मोठे काम पूर्ण केले आहे. भारताच्या विविध भागांमध्ये महाभारताची विविध रुपे हस्तलिखितांच्या स्वरुपात आपल्याला दिसतात. त्यांचा तपशीलवार अभ्यास करुन, अधिकृत भाग निर्धारित करुन चिकित्सित आवृत्ती तयार करण्यात आली. त्या पायावरच हा पुढील प्रकल्पाचा डोलारा उभा राहत आहे. महाभारताच्या सांस्कृतिक ज्ञानकोश तयार झाल्यानंतर त्यावर निबंध, संशोधनपर प्रबंध लिहिले जाऊ शकतात. महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीच्या इंगह्यजी अनुवादाचे कामही सध्या सुरु आहे. भावी योजनांमध्ये विविध प्रकारच्या अनुवादाचा समावेश असेल.