लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील पहिले सहकार विद्यापीठ म्हणजे सहकाराची पंढरी असलेल्या महाराष्ट्रात आणि त्यातही शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात उभारण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.
दिल्ली येथे देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी देशामध्ये सहकार विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. राज्यातील सहकार क्षेत्राकडून या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्याधर अनास्कर यांनी अमित शहा यांच्याकडे ही मागणी केली आहे.
अनास्कर म्हणाले की, सहकार विद्यापीठ लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी सध्याचे वैकुंठभाई मेहता सहकार प्रबोधिनीचे रुपांतर सहकार विद्यापीठामध्ये करण्याचा पर्याय सुचवला आहे. देशातील पहिले सहकार विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू करण्याचा प्रथम प्रस्ताव आम्ही सन २०१४ मध्ये राज्य शासनाला दिला होता. त्यानंतर पुन्हा सन २०१७ मध्ये तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या शिफारशीने तो पुनश्च राज्य सरकारकडे पाठविला असता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो तत्त्वत: मान्यही केला होता.
राज्य सहकारी बँकेने यासाठी पुढाकार घेत पुण्यातील मार्केट यार्ड येथील भू-विकास बँकेची जागा २५ कोटी रुपयांना विकतही घेतली होती. मात्र, दुर्दैवाने संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने सहकार विद्यापीठाची संकल्पना मूर्त स्वरुपात येऊ शकली नाही, असे अनास्कर यांनी सांगितले.