गेल्या काही वर्षांपासून परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यातच नवीन शैक्षणिक धोरणात त्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच देशातील सर्व विद्यापीठांमध्ये ऑफिस फॉर इंटरनॅशनल अफेअर्स स्थापन करण्याच्या सूचना यूजीसीने दिल्या आहेत.
ऑफिस फॉर इंटरनॅशनल अफेअर्सच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांशी निगडित असणारी सर्व प्रकरणे हाताळणे व भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणे, परदेशी विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रियेची माहिती सुलभपणे प्रसारित करणे, भारतीय शैक्षणिक संस्थांकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती परदेशी संस्थांना करून देणे, शैक्षणिक संस्थांचा दर्जा वाढवणे आदी कामे केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे परदेशातील सर्व शैक्षणिक संस्थांशी एकच ठिकाणाहून संपर्क साधता यावा आणि त्यांच्याबरोबर शैक्षणिक उपक्रम राबविता यावेत, परदेशी विद्यार्थ्यांच्या तक्रारी किंवा प्रश्न एकाच व्यासपीठावरून सोडविता याव्यात, या उद्देशाने ऑफिस फॉर इंटरनॅशनल अफेअर्सचा उपयोग केला जाणार आहे.