पुणे : कोरोनाबाधित लहान मुलांवरील उपचार पद्धती, औषधे व अन्य आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्याविषयी तयारी महापालिकेने सुरू केली असून, याकरिता बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची स्थापनाही महापालिकेने केली आहे. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली़
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याने, पुणे महापालिकेने बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेली टास्क फोर्स स्थापना केली आहे. तसेच लहान मुलांवरील उपचारासाठी टास्क फोर्सने केलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे़ सध्या कोरोनाबाधित लहान मुलांच्या उपचारासाठी शिवाजीनगर येथील सीओईपी जंबो हॉस्पिटलमध्ये ५० बेड, येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात २०० बेड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरमध्ये २०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेने शहरातील बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेच्या माध्यमातून शहरातील लहान मुलांसाठीच्या खासगी रुग्णालयांसोबत व तेथील डॉक्टर्ससोबतही समन्वय राखून कामकाज सुरू केले आहे. त्यानुसार जम्बो हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवरील उपचारासाठी ५ बेडचे आयसीयू सुरू करण्यात येणार आहे. तर आयसीयूसाठी येथील ५ व्हेंटिलेटरच्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल केले जाणार असून, राजीव गांधी रुग्णालयातही १५ व्हेंटिलेटर उपलब्ध केले जाणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले़
-------------------------------