लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आगामी काळात इंधनासाठी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य मिळणार असून, साखर उद्योगासाठी ते संजीवनी ठरणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे महत्त्व असाधारण आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
साखर आयुक्त शेखर गायकवाड व सहसंचालक (अर्थ) मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘साखर उद्योगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा एफआरपीवर होणारा परिणाम’ या पुस्तकाचे प्रकाशन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी (दि. २१) पवारांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, जलसंधारणमंत्री जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्याच्या धोरणात राज्य सरकारने सक्रिय सहभाग नोंदवत साखर कारखान्यांमधून देशात सर्वाधिक इंधन निर्मिती केली. या प्रक्रियेबाबतची सर्व उत्सुकता पुस्तकातून पूर्ण होईल, असे शेखर गायकवाड म्हणाले. तिटकारे यांनी आभार व्यक्त केले.