पुणे : पुणेमॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे यंदाही इथिओपियाच्या खेळाडूंनी बाजी मारली. रविवारी पहाटे सिंहगड रोड परिसरात झालेल्या पुणे मॅरेथॉनच्या ३४व्या पर्वात महिला गटाच्या हाफ मॅरेथॉनमधील तिसरा क्रमांक सोडला तर पुरुष तसेच महिलांच्या फूल आणि हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजविले. मागील वर्षीही इथिओपियाच्याच खेळाडूंनी स्पर्धा गाजविली होती.
या वर्षी पुणे शहरात ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरु असल्याने वाहतुकीत अडसर नको म्हणून ही स्पर्धा सिंहगड रोडवर घेण्यात आली. पुरुष गटातील फुल मॅरेथॉन शर्यत सोलोमन टेका याने २ तास १७.६ मिनिटे वेळेत जिंकली. अब्दु केबेबे दुसरा आला. २ तास ४६.६ मिनिटे वेळ देणारी इगेझू बेलायनेश महिलांच्या फूल मॅरेथॉनमध्ये अव्वल ठरली. सिमन तिलाहून हिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हायलू इतिचा आणि गाशू सम्रावित यांनी अनुक्रमे पुरुष तसेच महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. इतिचा याने १ तास ६.३ मिनिटे तर, गाशू हिने १ तास १७.६ मिनिटे वेळ देत शर्यत जिंकली.
पुरुषांच्या फुल मॅरेथॉनचा विजेता सोलोमन टेका म्हणाला, आमच्या इथिओपियाचे खेळाडू पुणे मॅरेथॉनमध्ये कायम जिंकत असल्याने मीही या स्पर्धेत सहभागी होण्यास उत्सुक होतो. ही शर्यत जिंकायचीच या निर्धाराने ३ महिने सरावात स्वतःला झोकून दिले होते. शर्यतीच्या प्रारंभापासून केबेबेने आघाडी घेतलेली होती. शेवटच्या टप्प्यासाठी ऊर्जा वाचवून ठेवण्याला मी प्राधान्य दिले. अखेरचे तीन ते साडेतीन किलोमीटर अंतर शिल्लक असताना मी वेग वाढविला आणि स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरलो.
निकाल फुल मॅरेथॉन : पुरुष गट : सोलोमन टेका (इथिओपिया, २ तास १७.६ मिनिटे), अब्दू केबेबे (इथिओपिया, २.१९.३), देगेफा मेर्गा बेकेले (इथिओपिया, २.२०.४). महिला गट : यिगेझू बेलायनेश (इथिओपिया, २.४३.६), सिमन तिलाहून (इथिओपिया, २.५८.३), हेई मॅगेर्तू (इथिओपिया, २.४९.१). हाफ मॅरेथॉन : पुरुष गट : हायलू इतिचा (इथिओपिया, १.०६.३), उर्गे कुबा (इथिओपिया, १.०७.१), हाईल मेंगिस्तू (इथिओपिया, १.०७.२). महिला गट : गाशू सम्रावित (इथिओपिया, १.१७.६), तेफेरा कोलोन (इथिओपिया, १.१८.१), गथेरु हना (केनिया, १.२१.१).