इंदापूर : फिर्याद दाखल करणाराचा उद्देश व वस्तुस्थिती समजून घेऊनच प्रशासन व कार्यकर्त्यांनी पावले उचलावीत, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी केले.तालुक्यात मागील काही काळापासून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले. जातीय तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा टिकून रहावा. विधायक चर्चा घडावी या करीता आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन भरणे बोलत होते.ते म्हणाले की,बऱ्याचदा गैरसमजातून पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होतात. व्यक्तीगत भांडणाचे जातीयवादी खटल्यात रुपांतर होते. घटनांचा विपर्यास होतो. आंदोलने छेडली जातात. किरकोळ कारणांवरुन शहर, गावे बंद ठेवली जातात. बाजारपेठा बंद ठेवल्या जातात. ज्यांची रोजीरोटी व्यवसायावर चालते. ज्यांचा दिनक्रम दैनंदिन मिळकतीवर अवलंबून आहे, अशांची त्यामुळे गैरसोय होते,हे लक्षात घेऊनच बंद गरजेचा असेल तरच तो पुकारला जावा.जातीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे.बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर म्हणाले की,आम्ही लोकसेवक आहोत. प्रशासन जनताभिमुख पध्दतीने चालवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तक्रार आल्यानंतर शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यात येत नाही. प्रशासनाकडून रास्त कारवाईची अपेक्षा असेल तर प्रशासनाला नि:पक्षपातीपणे तटस्थपणाने आपले काम करण्याची संधी दिली जावी.याबैठकीस पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, तहसीलदार सूर्यकांत येवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदिप गारटकर, रत्नाकर मखरे, शिवसेनेचे विशाल बोंद्रे, संभाजी व्यवहारे, प्रवीण माने, अॅड. राहुल मखरे, प्रा. कृष्णा ताटे, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, अंकुश जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य देवराज जाधव, प्रताप पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष अॅड कृष्णाजी यादव, मंगेश पाटील, शेखर पाटील, बाळासाहेब करगळ, अशोक चोरमले, ज्ञानदेव चवरे, दत्ता मिसाळ, नंदकुमार गुजर, बाबजी भोंग, संजय दोशी, नितीन कदम, नितीन आरडे, वसंत आरडे, रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जातीय सलोखा महत्त्वाचा
By admin | Published: March 06, 2016 1:10 AM