प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केवळ एका बसवर सुरू झालेला एसटीचा प्रवास आता १८ हजारपर्यंत पोहोचला आहे. खेड्यापाड्यात एसटी पोहोचली असून, आता ती ७४ वर्षांची झाली आहे. कोरोना काळातही एसटी धावली आणि प्रवाशांना दिलासा दिला. दररोज ६० लाख प्रवाशांची ने-आण करणारी एसटी कोरोना काळात १२ ते १३ लाख प्रवाशांची वाहतूक करीत आहे.
एसटी बस १ जून १९४८ साली झाली. तेव्हा केवळ एका बसवरून सुरू झालेला एसटीचा प्रवास आता १८ हजार गाड्यांपर्यंत पोहोचला. डिसेंबर १९४८ पर्यंत एसटीकडे ५५ गाड्या उपलब्ध होत्या. यात सर्वाधिक गाड्या ह्या पुणे विभागाच्या होत्या. पुणे विभागात ३६ गाडया गाड्या. तेव्हा रोज वीस ते तीस हजार प्रवासी वाहतूक होत असे.
१९३२ साली मुंबई प्रातांत खासगी व्यावसायिकाकडून सार्वजनिक वाहतूक सुरू झाली. १९४८ साली बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीची स्थापना होऊन त्याद्वारे सार्वजनिक प्रवासी वाहतूक करण्यात येऊ लागली. त्यावेळी राष्ट्रीयीकरणाची सुरुवात त्या वेळच्या मुंबई प्रांतातील अहमदाबाद येथून झाली. १ जून १९४८ साली पुणे-अहमदनगर दरम्यान पहिली बस बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची धावली. नंतर याचे रूपांतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमध्ये झाले.
बॉक्स 1
असा होता सुरुवातीचा काळ :
एसटी सुरू झाल्यावर पहिल्या तीन महिन्यांतच २२ गाडया दाखल झाल्या. त्यानंतर डिसेंबर १९४८ अखेरीस ५० गाड्या उपलब्ध झाल्या. या काळात पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, पुणे-मुंबई, पुणे-नागपूर अशा गाड्या धावू लागल्या. १९४९ साली १२३ गाड्या घेण्यात आल्या. सुरुवातीला एसटीने शहर एकमेकांना जोडण्याचे काम केले. त्यानंतर राज्यात ज्या प्रमाणात रस्ताची कामे होऊ लागली त्या प्रमाणात एसटीचा विस्तार वाढत गेला. रस्ता तिथे एसटी असे ब्रीद अंगिकारुन शहरापुरती मर्यादित राहिलेली एसटी तालुक्यात पोहोचली आणि नंतर गावा-गावांत मार्च १९५२ पर्यत एसटीचे ११ विभाग तयार झाले होते.
--------------------------
एसटीचा होता सुवर्णकाळ :
१९७५ साली खासगी प्रवासी वाहतूक बंद झाली. आणि हळूहळू एसटीला चांगले दिवस येऊ लागले. १९७८ ते १९८८ हा काळ एसटीचा हा सुवर्णकाळ म्हणून इतिहासात नोंद आहे. त्याकाळी एसटीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. एसटीचे भारमान हे ८४ इतके राहिले. १२ हजार एसटी संख्या होती आणि त्यातून रोज ६० ते ६२ लाख प्रवासी प्रवास करीत.
--------------------------