भोर : भोर तालुक्यात २२ व २३ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यात महावितरणचे १२ उच्चदाब ३७ लघुदाब वाहिनीचे पोल व दोन रोहित्र पडले. मोठ्या पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे, पूल वाहून जाणे, तसेच रस्त्यावर पुलावर पाणी येण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक भागांतील वाहतूक बंद होती. पाऊस कमी झाल्यावर व पाणी कमी होताच जिथे पोहोचता येत होते अशा ३८ ठिकाणी पोल उभे करून वीजपुरवठा काल (२४ जुलै) सुरळीत केला आहे.
हिर्डोशी शाखेत दरडी कोसळून, रस्ते वाहून गेल्याने वरंध घाट बंद आहे. त्यामुळे येथील ७ गावांचा अद्याप संपर्क तुटलेला आहे.या गावात पोहोचण्याचे पर्यायी मार्ग तीन आहेत. दुर्गाडी साळुंगण व महाड. मात्र त्यावरही दरडी कोसळल्या असल्याने ते ही मार्ग पूर्ण बंद आहेत.सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत व प्रशासकीय यंत्रणांना वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत संबंधित प्रशासनासोबत चर्चा झाली असून, त्यांनी सदर घाटात ३३ ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ता नादुरुस्त असल्याचे सांगितले आहे. तसेच हे रस्ते चालू होण्यास किमान २ दिवस लागतील असा प्राथमिक अंदाज आहे.शिरगाव पासून पुढील गावांचा संपर्क तुटला आहे.नीरा देवघर धरणाच्या डाव्या बाजूला वरची धानवली, अभेपुरी, दुर्गाडी, कुडली ,मानट वस्ती व वरंध घाटातील शिरगाव, अशिंपी, उंबरडे, शिळिंब, कुंड व राजीवडी या गावातील एकूण ११ रोहित्र व २९५ ग्राहक बंद आहेत.
काल व आज दि २५ जुलै रोजी वरंध घाटात पुढे चालत जाण्याचा प्रयत्न केला.शिरगाव पर्यंत चालत जाता आले त्यापुढे चालत जाणेही सध्या शक्य नाही. सदर वीज वाहिनी दरीतून असून दाट जंगल आहे, दोन्ही बाजूने दरड कोसळले आहेत, तसेच पडणारा पाऊस व धुके असल्याने नक्की आपल्या वाहिनीची काय स्थिती आहे, किती पोल पडले किंवा कसे ? याबाबत आत्ताच कोणतीही निश्चित माहिती नाही.त्यामुळे अद्याप या गावातील वीज पुरवठा सुरळीत करता आलेला नाही.जवळपास २० किमी उच्चदाब वीज वाहिनी सध्या बंद आहे.प्राथमिक अंदाजानुसार उच्चदाब वाहिनीचे किमान २० पोल व २ रोहित्र पडले असल्याचे समजले आहे.
आज दिवसभर दरडी दूर करण्याचे काम सुरू होते.२ किमी रस्ता मोकळा झाल्यास शिरगावच्या पुढे एक कटपॉईंट उभा करून अभेपुरी , दुर्गाडी व मानट वस्ती चे रोहित्र चालू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.ज्यामुळे ६५ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू होईल.उद्या संध्याकाळपर्यंत किती रस्ता मोकळा होईल व पावसाचा अंदाज घेऊन उर्वरित गावे व वाहिनी चालू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियता अरविंद वनमोरे व उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी सांगितले.
पावसाने पडलेले विजेचे खांब उभे करताना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी