पुणे : सरकार कोणाचेही असो आणि सरकार कुठलेही असो महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी काय केले, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. किती नेते गड-किल्ल्यांविषयी आस्था बाळगून आहेत आणि त्यातील किती जणांनी गड-किल्ल्यांवरून पदभ्रमण केले आहे, हा संशोधनाचा विषय आहे. केवळ शिवाजी महाराजांसारखे महापुरूष आणि गडकिल्ल्यांची नावे घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हेच सुरू असल्याची खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
गडकिल्ल्यांबद्दल असणारे प्रेम, त्यातून प्रत्यक्ष अनुभवलेला इतिहास, थक्क करणारी अभ्यासपूर्ण मांडणी, प्रत्यक्षपणे किल्ल्यांची अनुभूती देणारे नकाशे व चित्रे यांच्या आगळ्या-वेगळ्या मांडणीतून एसीपी सुरज गुरव यांनी लिहिलेल्या ‘माझं गडप्रेम’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी छत्रपती संभाजीराजे बोलत होते.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, आज महाराष्ट्रातील ३०० किल्ल्यांपैकी ४० किल्ले केंद्राच्या पुरातत्व विभागाकडे, तर ४० राज्याच्या पुरातत्व विभागाकडे आहेत. उर्वरित सुमारे २०० किल्ले वनविभाग आणि महसूल विभागाकडे येतात. रायगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली, मात्र नोकरशाहीच्या विविध जटील नियमांमध्ये गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन अडकून पडले आहे. किल्ल्यांची पुनर्बांधणी करणे किंवा त्या किल्ल्यांचे पुरावे आणि नोंदी असतील तर त्यांचे त्यानुसार जतन आणि संवर्धन करणे अशा दोन विचारधारा दिसून येतात. परंतु, इतिहासाला बाधा न पोहोचवता शिवाजी महाराजांचा इतिहास गाडला जाणार नाही, याची दक्षता घेऊन किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, हा मधला मार्ग स्विकारण्याची गरज आहे. आज रायगडावर सुरू असलेले संवर्धनाचे काम आम्ही पूर्वीच्या आणि जास्तीत जास्त शास्त्रोक्त पद्धतीने करीत आहोत. फोर्ट फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत आम्ही सरकारकडे २५ किल्ल्यांची मागणी करत असून शिवभक्तांच्या माध्यमातून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, असा शब्द आम्ही देतो.
ट्रेकिंग ऐवजी गड पदभ्रमंती या शब्दप्रयोगाचा वापर करावा
सरकारने आणलेली दत्तक योजना ही केवळ पर्यटनापुरती मर्यादित आहे, तर संवर्धन आणि जतनासाठी नाही. आमच्या दृष्टिकोतनातून गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन हे प्राधान्यक्रमावर असून पर्यटन हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आपल्या अस्मितेचा भाग असून आम्हाला तिथे राजस्थानमधील गडकिल्ल्यांवर असलेली ‘संस्कृती’ आणायची नाही. गडकिल्ल्यांच्या बाबतीत ट्रेकिंग हा जो शब्द वापरला जातो, त्याला देखील आमचा आक्षेप असून त्याठिकाणी गड पदभ्रमंती या शब्दप्रयोगाचा वापर करावा आणि तो रूजवावा असा आमचा आग्रह आहे. कारण महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आत्मचिंतन आणि महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे स्थळ असल्याचे छत्रपती संभाजीराजेंनी सांगितले.