पुणे : वादग्रस्त समान पाणी योजनेच्या १ हजार ८०० कोटी रुपयांच्या निविदेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून विरोधकांनी घेरल्यानंतरही महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी ठाम आहे. आयुक्तांकडून निविदा प्रक्रियेची सर्व माहिती घेऊन व नंतर निविदाधारकांशी वाटाघाटी करून त्यांनी दिलेल्या रकमेत किमान १०० कोटीची कपात करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाली.त्यासाठी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ तसेच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यांच्याकडून आयुक्तांना याबाबत विचारणा करण्यात आली असून येत्या एक-दोन दिवसात यासंदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे. जादा दराच्या निविदा येण्याचे कारण काय, निविदा येण्यापूर्वी निविदा दाखल करणाºया कंपन्यांशी चर्चा झाली होती का, प्रक्रियेत फक्त चारच कंपन्यांचा सहभाग का, एकाच कामाचे चार भाग करून वेगवेगळ्या निविदा काढण्याचे कारण काय, अशा काही गोष्टींची खुलासा आयुक्तांकडून महापालिका पदाधिकाºयांना अपेक्षित आहे. त्यानंतर निविदांबाबत अधिकृतपणे निर्णय घेण्याचे पदाधिकाºयांनी ठरवले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्याकडून निविदा प्रकरणी रोज भाजपावर आरोप केले जात आहेत. मनसे व शिवसेनाही त्यात भर घालत आहे. त्यातच भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही आयुक्तांना पत्र लिहून या कामाच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र सध्या ही प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर पूर्ण झालेली आहे, त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही, असे धोरण महापालिकेतील भाजपाच्या पदाधिकाºयांनी स्वीकारले आहे. प्रशासनाकडून स्थायी समितीकडे निविदांचा तुलनात्मक तक्ता मंजुरीसाठी आल्यानंतर पदाधिकाºयांचा या प्रक्रियेत सहभाग होतो, तोपर्यंत सर्व जबाबदारी प्रशासनाची असल्याचे त्यांनीच हवे तर आरोपांबाबत बोलावे, असे भाजपा पदाधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी चुप्पी साधली आहे.
हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतरही भाजपा शांतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:23 AM